माडखोल धरणाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये खर्च करूनही शेतकरी पाण्यापासून वंचित !

पाणीपुरवठा त्वरित चालू न केल्यास २० फेब्रुवारीपासून उपोषणाची ग्रामस्थांची चेतावणी

सावंतवाडी – तालुक्यातील माडखोल धरणाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या ४ वर्षांत अनुमाने २ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असूनही अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या कर्तव्यशून्य कारभारामुळे अनेक शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे येत्या ५ दिवसांत धरणाचे उजवा आणि डावा या दोन्ही कालव्यांच्या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा चालू न केल्यास २० फेब्रुवारीपासून धरणाच्या उजव्या कालव्यावर माडखोल, फणसवाडी येथे ग्रामस्थांसह आमरण उपोषण करू, अशी चेतावणी माडखोलचे उपसरपंच कृष्णा राऊळ यांनी दिली आहे.

याविषयी लघुपाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की …

१. माडखोल धरण शासकीय मालकीचे असून ते व्यापक जनहिताच्या दृष्टीने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधले आहे. या धरणावर कालवे बांधून धरणाचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतीपर्यंत पोचवणे हे शासनाचे कायदेशीर दायित्व आहे; परंतु धरणाचे पाणी माडखोल गावातील शेतकर्‍यांच्या शेतीपर्यंत पोचत नसल्याने शेतकरी आणि राजकीय पदाधिकारी यांनी शासनाकडे अर्ज केले, तसेच प्रसंगी उपोषणेही केली.

२. त्यानंतर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांसाठी २ कोटी रुपये निधी वर्ष २०१९ मध्ये उपलब्ध झाला. त्यानंतर वर्ष २०२२ मध्ये आवश्यक साहित्य आणले गेले; मात्र ते अद्यापपर्यंत तसेच पडून आहे. वर्ष २००९ मध्ये ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे मुख्य कालवा वाहून गेला, तरीही उपाययोजना न केल्याने गावातील शेतकरी वर्ष २०२३ पर्यंत पाण्याविना वंचित राहिले, ही वस्तूस्थिती आहे.

३. प्रशासनाच्या दायित्वशून्य आणि अकार्यक्षम कारभारामुळे या निधीचा अपव्यय होऊन या दोन्ही कालव्यांचे काम मागील ५ वर्षांत पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे गावातील शेतकर्‍यांना पाण्यासाठी धरण असूनही वणवण सहन करावी लागत आहेत. त्यामुळे गावातील ग्रामस्थ प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या सिद्धतेत आहेत.

संपादकीय भूमिका

ग्रामस्थांना उपोषणाची चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !