पर्यटन खात्याची समुद्रकिनारपट्टीतील ‘शॅक’ उपकंत्राटावर देणार्‍यांच्या विरोधात कारवाईची मोहीम

उत्तर गोव्यात १०९ शॅकमालकांनी उपकंत्राट दिल्याचे उघड ३८ ‘शॅक’ना नोटिसा पाठवल्या

(‘शॅक’ म्हणजे समुद्रकिनारपट्टीवरील खाद्यपदार्थ आणि मद्य यांचा पुरवठा करणारे उपाहारगृह)

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – समुद्रकिनारपट्टीवर गोव्याबाहेरील व्यक्ती चालवत असलेल्या ‘शॅक’मध्ये हल्लीच्या काळात झालेले गुन्हे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, या कारणांमुळे पर्यटन खात्याची समुद्रकिनारपट्टीतील ‘शॅक’चे उपकंत्राट देणार्‍यांच्या विरोधात कारवाईची मोहीम आरंभली आहे.

याविषयी अधिक माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘पर्यटन खात्याने केलेल्या अन्वेषणात उत्तर गोव्यात २०६ पैकी १०९ शॅक्सचे उपकंत्राट दिल्याचे उघड झाले आहे आणि यांपैकी ३८ ‘शॅक’मालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, तर उर्वरितांचे अन्वेषण चालू आहे. एकूण सुमारे ३६१ मधील ३५ टक्के ‘शॅक’ गोव्याबाहेरील व्यक्तींना चालवण्यासाठी दिल्याची माहिती पर्यटन खात्याला मिळाली आहे. समुद्रकिनारपट्टीवर सर्वांची सुरक्षा महत्त्वाची आहे. सरकारने ‘शॅक’ धोरण हे स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी आखले आहे. त्यामुळे ‘शॅक’ उपकंत्राटावर देणे गैर आहे. पर्यटन खाते ‘शॅक’वर कठोर नजर ठेवून आहे. ‘शॅक’वर विदेशी खाद्यपदार्थांऐवजी गोव्यातील खाद्यपदार्थांना
प्रोत्साहन दिले पाहिजे. पर्यटन खात्याने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार ‘शॅक’ने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन केले पाहिजे. या नियमानुसार ‘शॅक’ला रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मोठ्या आवाजात संगीत लावता येत नाही. ‘शॅक’मधील संगीतामुळे शेजारच्यांना त्रास होता कामा नये, तर हे संगीत केवळ ‘शॅक’मध्ये उपस्थित असणार्‍यांना ऐकू आल्यास पुरे. ‘शॅक’धारक नियमांचे पालन करत नसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.’’