सत्र न्यायालयाचा निकाल

पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यातील खाण घोटाळ्यातील एका प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह १६ जण निर्दाेष असल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. या १६ जणांमध्ये रवींद्र प्रकाश या खाण व्यावसायिकाचाही समावेश आहे. वर्ष २०१७ ते २०२१ या काळात काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री असतांना दिगंबर कामत यांच्यावर खाण घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. कामत यांनी मुदत संपूनही खाण लीज चालूच ठेवण्यास अनुज्ञप्ती दिली असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या खाण घोटाळ्याचे अन्वेषण सरकारने विशेष अन्वेषण पथकाकडे दिले होते. त्यानुसार विशेष अन्वेषण पथकाने दिगंबर कामत आणि अन्य १६ जण यांच्या विरोधात आरोपपत्र सादर केले. त्याविषयी १४ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सर्वांना दोषमुक्त केले आहे.
केपे आणि सांगे येथील ‘काडणेकर माईन्स’मधून ‘मॅगनम् प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने अवैधपणे खनिज मालाचे उत्खनन केले. त्यानंतर त्यांनी चीन येथे सुमारे २ मिलियन टन खनिजाची निर्यात केली. वर्ष २००६ ते २०२१ या कालावधीत हे अवैध उत्खनन झाले असून मॅगनम प्रायव्हेट लिमिटेड हे काडणेकर माईन्ससाठी कंत्राटदार म्हणून काम करत होते. या अवैध खाण व्यवसाय प्रकरणी खाण खात्याचे तत्कालीन
संचालक प्रसन्ना आचार्य यांनी विशेष अन्वेषण पथकाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण केल्यानंतर विशेष अन्वेषण पथकाने गुन्हा नोंद करून संबंधितांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने न्यायालयात ७०० पानी आरोपपत्र सादर केले होते. यामध्ये २५ साक्षीदारांचा समावेश होता.