आग विझवल्यावर ‘देवाची कृपा’ असे ‘फायर ब्रिगेड’ म्हणाले !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

सध्या प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे महाकुंभमेळा चालू आहे. १९ जानेवारी या दिवशी सेक्टर १९ मधील एका तंबूमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि ‘गीता प्रेस’च्या २०० तंबूंचा कोळसा झाला. या दुर्घटनेवर महाराष्ट्रातील पुरो(अधो)गाम्यांनी अध्यात्म, देव, कर्मकांड यांवर टीका केली नसती, तर नवलच होते; पुरो(अधो)गाम्यांनी या दुर्घटनेवर केलेली काव्यरूपी टीका आणि त्यावर दिलेले खंडणात्मक प्रत्युत्तर येथे देत आहोत.

प्रयागराज महाकुंभपर्वात तंबूंना लागलेली आग

(म्हणे) ‘चमत्काराने नव्हे… विज्ञानाने आग विझवली !’

सनातन धर्माने नव्हे… विज्ञानाने आध्यात्मिकांचे प्राण वाचवले ।
देव नव्हे… फायर ब्रिगेड धावून आले ।।

अज्ञात शक्ती सुरक्षा करत नसते… विज्ञानाची आयुधे करतात ।
आध्याित्मक विद्येने नव्हे… विज्ञानाच्या विमानातून नेत्यांना पहाणी करावी लागते ।।

लोकशाहीने निर्माण केलेल्या पोलीस यंत्रणेने आध्यात्मिकांना कवच दिलंय ।
विधी-कर्मकांडांनी नव्हे ।।

वैज्ञानिक अज्ञान आध्यात्मिक आगी निर्माण करते…।
वैज्ञानिक ज्ञान विवेक घडवते ।।

पोकळ बडेजाव अध्यात्माचा…।
वास्तव आसरा असतो, विज्ञान अन् वैज्ञानिक दृष्टीकोनाचा ।।

विज्ञानाचा नव्हे, मानवाला आधार केवळ अध्यात्माचा !

पुरोगाम्यांच्या या टीकात्मक कवितेवर हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी दिलेले काव्यरूपी प्रत्युत्तर…

श्री. प्रशांत जुवेकर

म्हणे चमत्काराने नव्हे…विज्ञानाने आग विझवली
या विज्ञानाची कास मात्र सनातन हिंदु धर्मानेच धरायला शिकवली…

म्हणे विज्ञानाने आध्यात्मिकांचे प्राण वाचवले !
या विज्ञानातील बहुसंख्य शोध आध्यात्मिकांनीच तर लावले !

म्हणे देव नव्हे…‘फायर ब्रिगेड’ धावून आले !
आग विझवल्यावर ‘देवाची कृपा’ असे ‘फायर ब्रिगेड’ म्हणाले ।

म्हणे अज्ञात शक्ती सुरक्षा करत नसते…विज्ञानाची आयुधं करतात !
विज्ञान जिथे थांबते, तिथे मग अज्ञात शक्तीचा शोध आणि धावा चालू करतात !

म्हणे आध्यात्मिक विद्येने नव्हे…विज्ञानाच्या विमानातून नेत्यांना पहाणी करावी लागते !
पहाणी केल्यावर योग्य निर्णय घेणे, इतरांचा सर्वांगीण विचार करणे यांसाठी आध्यात्मिक बैठक असावी लागते !

म्हणे लोकशाहीने निर्माण केलेल्या पोलीस यंत्रणेने आध्यात्मिकांना कवच दिलय..!
याच आध्यात्मिकांनी लोकशाहीत असलेला पोलिसांच्या मनावरील ताण दूर केला आहे !

म्हणे वैज्ञानिक अज्ञान आध्यात्मिक आगी निर्माण करते…पण आध्यात्मिक अज्ञान संपूर्ण सामाजिक जीवन उद्ध्वस्त करते !
म्हणे पोकळ बडेजाव अध्यात्माचा… वास्तव आसरा असतो, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा ।

विज्ञानाने भौतिक गरजा भागल्या, तरी चिरंतन आनंद मिळवण्यासाठी मानवाला आधार केवळ अध्यात्माचा, अध्यात्माचा, अध्यात्माचा….।।

– श्री. प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव. (२१.१.२०२५)