जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेस होणार आरंभ !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयात पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे. ६ महिने मुदतीच्या या अभ्यासक्रमातून व्यावसायिक पद्धतीने मंदिर व्यवस्थापनाची कौशल्ये, मंदिर व्यवस्थापनाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलू या विषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. फेब्रुवारीपासून विद्यापिठाच्या नाशिक संकुलात, तर पुणे येथे जूनपासून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे. (‘मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम’ या उपक्रमाला प्रारंभ केल्यावरून विद्यापिठाचे अभिनंदन ! यामागे ‘केवळ व्यावसायिक हेतू न ठेवता धर्माचे पालन करणे, मंदिरांचे आध्यात्मिक महत्त्व वाढवणे, धर्माचा प्रसार-प्रचार करणे आणि या सर्वांतून धर्माधिष्ठित समाज निर्मितीचा उद्देश साध्य करण्यासाठी हा अभ्यासक्रम असावा’, असे प्रत्येक धर्मप्रेमी हिंदूला वाटते ! – संपादक)
विद्यापिठाने या अभ्यासक्रमासाठी ‘टेम्पल कनेक्ट’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या वेळी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, ‘टेम्पल कनेक्ट’चे संस्थापक गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे उपस्थित होते.
‘या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सूक्ष्म मंदिर व्यवस्थापकांची नवी पिढी घडणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमातून महत्त्वपूर्ण परिणाम घडण्याची अपेक्षा आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येऊ शकतात’, असे कुलगुरु डॉ. गोसावी म्हणाले.
‘मंदिर व्यवस्थापन पदविका हे मंदिर व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील पुढील पाऊल आहे. मंदिर परिसंस्थेमध्ये (‘टेम्पल इकोसिस्टम’मध्ये) नावीन्यपूर्ण आणि शाश्वत पालटांसाठी विद्यार्थी घडवण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या काळात ६ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, १ वर्षाची पदविका आणि २ वर्षांचा मंदिर व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (एम्.बी.ए.) चालू करण्याचे नियोजन आहे’, असे कुलगुरूंनी सांगितले.
‘मंदिर व्यवस्थापन’ अभ्यासक्रम म्हणजे या क्षेत्रात प्रगती करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल !
– गिरीश कुलकर्णी
या संदर्भात ‘आय.टी.सी.एक्स्.’चे संस्थापक आणि ‘टेम्पल कनेक्ट’चे संस्थापक श्री. गिरीश कुलकर्णी यांनी ‘सनातन प्रभात’ला सांगितले की, हा अग्रगण्य शैक्षणिक कार्यक्रम म्हणजे मंदिर व्यवस्थापनाच्या क्षेत्रात प्रगती करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘टेम्पल कनेक्ट’ विद्यार्थ्यांना नवकल्पना आणि शाश्वत पालट घडवून आणण्यास सुसज्ज करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मला निश्चिती आहे की, ५० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी आमच्या विस्तृत नेटवर्कद्वारे ‘इंटर्नशिप’ मिळवतील. त्यातून त्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील.