मकरसंक्रांतीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास, तर रुक्मिणीदेवीला पारंपरिक अलंकार !

सुलभ आणि जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने ‘ऑनलाइन’ दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ! 

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीदेवी यांची केलेली विशेष पूजा

पंढरपूर – प्रतिवर्षाप्रमाणे मकरसंक्रांतीच्या निमित्तिने प्रथा आणि परंपरा यांचे पालन करून मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. श्री रुक्मिणीदेवीला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले असून यात सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, जवेच्या माळा, तांबडी चिंचपेटी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, जवमणी पदक, हायकोल, सरी, कंबरकट्टा, लक्ष्मीहार अशा अलंकारांचा समावेश आहे. संक्रांतीच्या निमित्ताने महिला भाविकांनी विशेषकरून मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात महिला भाविकांची विशेष गर्दी
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात महिला भाविकांची विशेष गर्दी

मंदिरात गाभारा, चारखांबी, नामदेव पायरी येथील भाग पुणे येथील राहुल ताम्हाने यांनी सेवाभावी तत्त्वावर विनामूल्य केली आहे. त्यासाठी ५०० किलो लाल गोंडा, ५०० किलो पिवळा गोंडा, २०० किलो शेवंती, ५० किलो गुलछडी, ५०० किलो कामिनी, १०० किलो ऍस्टर फुलांचा, तसेच वांगी, गाजर, कारले, वाटाणा, पावटा, भोपळा, लाल पापडी, पांढरी पापडी इत्यादींचा वापर केला आहे.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीसमोर केलेली विशेष आरास
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री रुक्मिणीदेवीच्या मूर्तीसमोर केलेली विशेष आरास

भाविकांची गर्दी विचारात घेऊन, सुलभ आणि जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने ‘ऑनलाईन’ दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे, तसेच थेट दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या अल्प करणे, महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक आणि आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. श्री रुक्मिणीदेवीला सुवासिनी महिलांनी नवधान्याचे वाण अर्पण करण्यासाठी गर्दी केली असून सहस्रो महिला भाविक पहाटेपासूनच ताटात हळद, कुंकू, तीळगूळ, ऊस, बोर, गाजर, हुरडा यांसह अन्य प्रकारचे धान्य अर्पण करण्यासाठी मंदिरात आल्या होत्या. फुलांची सजावट, पुरेशा सोयी-सुविधा, चांगली स्वच्छता, चांगल्या दर्शन व्यवस्थेने भाविक समाधान व्यक्त करत आहेत. सोयी सुविधांचे नियोजन मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीदेवीच्या मंदिराची बाहेरून केलेली विशेष सजावट