मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळूनही तिची स्‍थिती विदारकच ! – साहित्‍यिक विश्‍वास पाटील

पुणे – मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध) दर्जा’ मिळाला आहे; परंतु प्रत्‍यक्षात मराठी भाषेची लक्‍तरे तशीच आहेत. शहरे, गावे, खेडी, वस्‍त्‍या यांमधून मराठी भाषेची स्‍थिती विदारक आहे. हे लक्षात घेऊन योग्‍य उपाययोजना करायला हव्‍यात, अशा शब्‍दांत ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक विश्‍वास पाटील यांनी मराठीच्‍या वस्‍तूस्‍थितीवर भाष्‍य केले. ते ‘रोटरी क्‍लब’कडून पुणे येथे पहिल्‍या ‘रोटरी मराठी साहित्‍य संमेलना’त बोलत होते. कोथरूड येथे हे संमेलन पार पडले.

पाटील म्‍हणाले की, अभिजात दर्जा मिळाला; म्‍हणून मराठी समृद्ध झाली, असे नाही. तिच्‍या समृद्धीसाठी गावे, शाळा, ग्रंथालये यांमधून प्रयत्न केले पाहिजेत. मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठीतील ग्रंथव्‍यवहार, पत्रव्‍यवहार चिंताजनक आहे. साहित्‍याचा आवाज मानवी आत्‍म्‍याचा आवाज असतो. तो भाषेच्‍या माध्‍यमातून अभिव्‍यक्‍त होतो. भाषा जपली पाहिजे, व्‍यवहारात असली पाहिजे.

ज्ञानपीठ पुरस्‍कार प्राप्‍त ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक वि.वा. शिरवाडकर यांनी म्‍हणाले, ‘‘‘मराठी भाषा मंत्रालयाच्‍या दाराशी भीक मागत असून तिच्‍या अंगावर लक्‍तरे आहेत’, हे चित्र आजही दिसते.’’

संपादकीय भूमिका

केंद्रशासनाने मराठी भाषेला दिलेला अभिजात भाषेचा दर्जा टिकवून ठेवण्‍यासाठी मराठीप्रेमींनी आता पुढाकार घ्‍यायला हवा !