मागणीची नोंद न घेतल्यास रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्याचा रहिवाशांचा निर्धार
नवी मुंबई – सानपाडा-पामबीच येथील सेक्टर १७ मध्ये होणार असलेल्या ऑर्केस्ट्रा बार (डान्स बार) विरोधातील स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी शेकडो नागरिकांनी पोलीस आयुक्तालयाकडे ‘हरकती पत्र’ प्रविष्ट करत तीव्र विरोध नोंदवला आहे. या बारमुळे परिसरात असामाजिक कृत्य घडू शकणार असल्याने त्या विरोधात स्थानिक माजी नगरसेविका रूपाली भगत आणि वैजयंती भगत यांनी येथील प्रभागातील नागरिकांसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परवाना शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्याकडे हरकती पत्राचे निवेदन दिले. त्यानंतर माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि युवा नेते निशांत करसन भगत यांच्या उपस्थितीत प्रस्तावित बारच्या विरोधात सानपाडा-पामबीच येथील गुनीना मैदानाजवळ स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. (नागरिकांचा बारला तीव्र विरोध लक्षात घेऊन प्रशासन बार बंद करणार का ? – संपादक)
या स्वाक्षरी मोहिमेला प्रचंड प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या संख्येने हरकत पत्रे सादर केली.
या वेळी पोलीस प्रशासनाकडे जमा होणार्या आमच्या हरकतींची नोंद घेऊन येथे डान्स बारला परवाने देऊ नयेत, तसेच कायद्याचे उल्लंघन करून देण्यात आलेला मद्य परवानाही रहित करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. याची शासनाने नोंद न घेतल्यास लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्याचा निर्धार रहिवाशांनी व्यक्त केला.
नागरिकांनी त्यांच्या हरकती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात १७ डिसेंबरपर्यंत नोंदवाव्यात, असे आवाहन भगत यांनी केले आहे.