नामजप श्‍वासाला जोडण्‍याचे महत्त्व आणि त्‍यासाठी करायचे प्रयत्न

‘आपला श्‍वास नेह  वर्तमानकाळात असतो. तो कधीही ‘भविष्‍य’ किंवा ‘भूत’ या काळांत जाऊ शकत नाही. नामजप करतांना आपले मन ‘भविष्‍य’ किंवा ‘भूत’ या काळात रमते. मनाला वर्तमानात आणण्‍यासाठी नामजप श्‍वासाला जोडणे आवश्‍यक आहे. त्‍याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

१. मनातील विचारांमुळे नामजप अखंड न होणे

मनात भविष्‍य किंवा भूत या काळांचे विचार आल्‍यास मन विचलित होते अन् नामजप एकाग्रतेने होत नाही. नामजप मधेच थांबतो आणि ‘मन विचारांच्‍या प्रवाहात कधी अडकते’, ते कळतही नाही. नामजप अखंड न होण्‍यामध्‍ये मनातील विचार अडथळे आणतात.

२. श्‍वास आणि विचार यांचा थेट संबंध असून मनातील विचारांची संख्‍या वाढली की, श्‍वासाची गतीही वाढणे

श्‍वास आणि विचार यांचा थेट संबंध आहे. राग आला की, मनातील विचारांची संख्‍या वाढते, तसेच श्‍वासाची गतीही वाढते. जेव्‍हा मन शांत असते, तेव्‍हा मनातील विचारांची संख्‍या अत्‍यल्‍प असते आणि त्‍यामुळे श्‍वासाची गती मंदावते. जेव्‍हा व्‍यक्‍तीचे चिडचिड होणे, राग येणे, प्रतिक्रिया येणे, काळजी वाटणे आदी स्‍वभावदोष उफाळून येतात, त्‍या वेळी व्‍यक्‍तीने स्‍वतःच्‍या श्‍वासाकडे लक्ष केंद्रित केले, तर स्‍वभावदोषांची तीव्रता न्‍यून होण्‍यास साहाय्‍य होते. व्‍यक्‍तीच्‍या विचारांची गती आणि संख्‍या पूर्णपणे न्‍यून होऊन मन शांत होऊ लागते. रागाच्‍या स्‍थितीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी काही वेळा दीर्घ श्‍वसन करायला सांगितले जाते. त्‍याचे कारणही हेच आहे. या सगळ्‍यांतून असे लक्षात येते की, ‘मनाची स्‍थिती श्‍वासाच्‍या स्‍थितीशी जोडलेली असते.’

३. मनात येणारे विचार न्‍यून करण्‍यासाठी श्‍वास नामजपाला न जोडता नामजप श्‍वासाला जोडणे आवश्‍यक !

नामजप करत असतांना येणार्‍या अडथळ्‍यांमधील प्रमुख अडथळा आहेे, मनात येणारे विचार ! ‘मन नामावरून कधी आणि कसे भरकटते अन् मनात अन्‍य विचार येऊ लागतात’, हे लक्षातही येत नाही. त्‍यामुळेच ‘नामजप श्‍वासाला जोडा’, असे सांगितले जाते. अनेक नामधारक हा प्रयत्न करतात; परंतु हे साध्‍य होणे कठीण असते. नाम आणि श्‍वास यांची गती जुळवणे  अधिक काळ जमत नाही. नामजपातील शब्‍द संख्‍या आणि शब्‍दोच्‍चार करण्‍यास लागणारा वेळ अन् आपल्‍या श्‍वासोच्‍छ्‍वासाला लागणारा वेळ अन् कालावधी भिन्‍न असतो. बहुतेक जण ‘नाम श्‍वासाला जोडा’, याचा चुकीचा अर्थ काढतात आणि प्रत्‍येक श्‍वासाला नाम जोडण्‍याचा प्रयत्न करतात. त्‍यामुळे नाम श्‍वासाला जोडले न जाता उलट होते, म्‍हणजे श्‍वास नामाला जोडण्‍याचा प्रयत्न होतो. त्‍यामुळे ते जमत नाही किंवा सहजतेने होत नाही.

४. श्‍वासाचे गुणधर्म किंवा वैशिष्‍ट्ये

श्री. प्रकाश करंदीकर

अ. श्‍वास सतत आणि अखंड चालू असतो.

आ. ‘आपण श्‍वास घेत आहोत’, याची मनाला जाणीवही नसते. तो सहजतेने घेतला जातो. श्‍वास घेण्‍याकडे लक्ष द्यावे लागत नाही. अनेक गोष्‍टी आणि कृती करतांना आपला श्‍वास नकळत चालू असतो.

इ. श्‍वासाची गती मनाच्‍या स्‍थितीवर अवलंबून असते. विचार आणि श्‍वास यांचा थेट संबंध आहे. श्‍वास थांबला की, आपले विचारही थांबतात किंवा न्‍यून होतात.

ई. श्‍वास घेणे, हे अष्‍ट अवधानांपैकी (जाणिवांपैकी) एक अवधान आहे. पंचज्ञानेंद्रिये, उदा. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्‍वचा, तसेच मन, बुद्धी अन् चित्त ही अष्‍ट अवधाने आहेत.

उ. श्‍वास घेण्‍याचा कालावधी हा श्‍वास सोडण्‍याच्‍या कालावधीपेक्षा अल्‍प असतो.

ऊ. ‘कुंभक’ केल्‍याने, म्‍हणजे श्‍वास आणि उच्‍छ्‍वास यांचा कालावधी वाढवल्‍याने, म्‍हणजे श्‍वास काही काळ रोखून धरल्‍याने श्‍वासांची एकूण संख्‍या अल्‍प होते.

ए. श्‍वासाची गती शरिरातील रक्‍ताभिसरणाच्‍या गतीवर अवलंबून असते.

ऐ. श्‍वास घेणे, ही जीवनातील सर्वाधिक आवश्‍यक कृती आहे किंबहुना श्‍वास म्‍हणजेच जीवन आहे.

ओ. श्‍वास ही ‘मी’पणाची जाणीव आहे. स्‍वतःच्‍या अस्‍तित्‍वाची जाणीव आहे.

औ. श्‍वासाला स्‍थळ, काळ, परिस्‍थिती आणि प्रसंग यांचे बंधन नसते.

५. नामजप श्‍वासाला जोडण्‍यासाठी करायचे प्रयत्न

५ अ. नामजपाचा कालावधी वाढवणे : श्‍वास अखंड चालू असतो, तसा नामजपही अखंड चालू ठेवण्‍याचा प्रयत्न करावा. ‘माझा नामजप चालू आहे ना ?’, असा प्रश्‍न मनाला अधूनमधून विचारावा. ‘नामजप बंद झाला’, असे लक्षात आले की, तो पुन्‍हा चालू करावा. असे वारंवार केले की, नामजपाचा कालावधी हळूहळू वाढू लागेल.

५ आ. दैनंदिन सर्व कृतींशी नामजप जोडणे : नामजपाचा कालावधी हळूहळू वाढू लागल्‍यावर नाम शरिराच्‍या हालचालींशी जोडावे. दिवसभरातील असंख्‍य कृती करतांना त्‍या प्रत्‍येक कृतीला नामजप जोडावा. अन्‍न ग्रहण करतांना घास चावल्‍याचा आवाज येतो. त्‍या वेळी नामजप करावा. पाणी पितांना, तसेच घास गिळतांनाही नामजप करावा. काही मास चिकाटीने असे प्रयत्न केले की, नामजपात अखंडता येऊ लागते. नंतर नामजपात एक सहजावस्‍था येऊ लागते.

५ इ. मनुष्‍य अष्‍टावधानी असल्‍याने नामजप करत अन्‍य कामे करणे : नामजपाचे प्रयत्न चालू ठेवले की, नामाचे एक अवधान सिद्ध होते. मनुष्‍य अष्‍टावधानी असतो, म्‍हणजे   एकाच वेळी तो ८ प्रकारची भिन्‍न भिन्‍न विषयांची कामे आणि विचार करू शकतो. मनुष्‍य अष्‍टावधानी असल्‍यामुळे नाम घेत असतांनाच एकीकडे त्‍याला विचार, वाचन, चिंतन, अभ्‍यास आणि बुद्धीची कामेही सहजपणे करता येतात.

५ ई. ‘श्‍वास घेणे’ ही मनुष्‍याची आवश्‍यकता असून ‘नामजप करणे’, हीसुद्धा आवश्‍यकताच आहे’, हे महत्त्व बिंबवणे : काही वेळा ‘प्रयत्न न करताही आपला नामजप चालू आहे’, याची अनुभूती येते. ‘श्‍वास घेणे’ ही मनुष्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍याचप्रमाणे ‘नामजप करणे’, हीसुद्धा आवश्‍यकताच आहे’, असे वाटले पाहिजे. ‘श्‍वास चालू असणे म्‍हणजे जीवन, तर श्‍वास बंद पडणे, म्‍हणजे मरण होय ! नामजप करणे, ही स्‍वतःच्‍या अस्‍तित्‍वाची जाणीव आहे. तो चालू असणे, ही जिवंतपणाची खूण झाली पाहिजे. नाम आहे, तेथे भगवंताचे सतत अस्‍तित्‍व असते, म्‍हणजे ‘स्‍वतःच्‍या अस्‍तित्‍वाच्‍या जाणिवेतून ‘भगवंताचेही अस्‍तित्‍व माझ्‍यात आहे’, याची जाणीव होऊ लागते. ‘भगवंत सतत माझ्‍या समवेत आहे’, असा भाव मनात निर्माण होऊ लागतो. ‘माझा श्‍वास, म्‍हणजे माझा भगवंत’, असा भाव ठेवावा, म्‍हणजे भगवंताचे अस्‍तित्‍व सतत जाणवू लागेल !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अपार कृपेमुळे माझ्‍याकडून वरील चिंतन झाले. यासाठी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रकाश वसंत करंदीकर (वय ६७ वर्षे), फोंडा, गोवा. (३.७.२०२४)