३०.५.२०२४ या दिवशी कोल्हापूर येथील ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक-उद्योजक श्री. आनंद पाटील, त्यांचा मुलगा नील, सून सौ. प्रियांका आणि त्यांचे व्यवसायातील सहकारी श्री. अखिलेशसिंग यादव, हे सर्व जण एका कामासाठी कोल्हापूरहून बेळगावला जायला निघाले होते. श्री. आनंद पाटील हे स्वतः त्यांची ‘बोलेरो’ गाडी चालवत होते. वाटेत त्यांच्या गाडीला झालेल्या मोठ्या अपघातातून ते चौघेही वाचले. या अपघाताच्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. चारचाकी गाडीने प्रवास करतांना राष्ट्रीय महामार्गावर गाडी उलटून अपघात होणे
‘३०.५.२०२४ या दिवशी सकाळी आम्ही पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाने कोल्हापूरहून बेळगावला जायला निघालो. वाटेत काही ठिकाणी हा महामार्ग रुंद करण्याचे काम चालू होते. आम्ही सकाळी ९.३० वाजता संकेश्वर (कर्नाटक) या गावाजवळ पोचलो. तिथे नव्याने बांधकाम केलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावरून वाहतूक चालू होती. त्यामुळे आम्हीही त्याच रस्त्याने जात होतो. बाजूला सुमारे दीड फूट खोल जुना रस्ता होता. तिथे समोरून एक दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने (त्याच्या उजव्या बाजूने) आला. त्याला वाचवण्यासाठी मी गाडी बाजूला घेऊ लागलो. तेव्हा गाडी रस्त्यावरून खाली कलंडली आणि २ – ३ वेळा उलटी-सुलटी होऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली.
२. दुखापत झालेल्या स्थितीत साधक, त्याचा मुलगा आणि सहकारी गाडीतून बाहेर येणे अन् सुनेला गाडीचे दार तोडून बाहेर काढावे लागणे
हे सर्व इतक्या अल्प वेळात झाले की, ‘नेमके काय झाले ?’, ते आम्हाला समजलेच नाही. थोड्या वेळाने लक्षात आले की, माझा मुलगा नील याला फारसे लागलेले नव्हते. त्यामुळे तो प्रथम गाडीतून बाहेर आला. श्री. यादव घायाळ झाले होते; पण ते गाडीतून बाहेर येऊ शकले. माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला जोराचा मार लागला होता. मी माझ्या आसंदीचा पट्टा काढल्यानंतर साहाय्यासाठी आलेल्या लोकांनी माझा हात धरून मला बाहेर काढले. माझी सून प्रियांका हिच्या डोक्यात काचा घुसल्या होत्या. पुष्कळ रक्त येत होते. तिचा डावा पाय आसंद्यांमध्ये अडकला होता. त्यामुळे तिला गाडीतून बाहेर पडता येत नव्हते; म्हणून गाडीचे दार तोडून तिला बाहेर काढावे लागले.
३. अपघातानंतर २ घंट्यांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोचणे
हे सर्व होईपर्यंत स्थानिक लोकांनी बोलावलेली रुग्णवाहिका तिथे आली. त्या रुग्णवाहिकेतील कर्मचार्यांनी आम्हाला ‘बेळगाव येथील एका रुग्णालयात नेतो’, असे सांगितले. हे ऐकल्यावर माझ्या मनात ‘तेथे योग्य आधुनिक वैद्य मिळतील का ?’, अशी शंका आल्याने मी त्यांना कोल्हापूर येथे आधुनिक वैद्य संतोष प्रभु यांच्या ‘विन्स’ रुग्णालयात पोचवण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. अपघातानंतर २ घंट्यांनी आम्ही त्या रुग्णालयात पोचलो.
४. रुग्णालयात भरती झाल्यावर तेथे सर्वांची ‘सी.टी.स्कॅन’ (टीप) तपासणी करण्यात आली. गुरुदेवांच्या कृपेने कुणालाही गंभीर किंवा दीर्घकाल परिणाम करणारी दुखापत झालेली नव्हती.
टीप – सी.टी.स्कॅन : रुग्णाच्या आजाराचे निदान करण्यासाठी त्याच्या शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान.
५. एरव्ही विदेशात असणारे आधुनिक वैद्य गुरुकृपेने रुग्णालयात असणे आणि त्यांनी सुनेवर उपचार करणे
रुग्णालयातील शस्त्रक्रिया तज्ञ आधुनिक वैद्य संतोष प्रभु हे बर्याच वेळा विदेशात असतात. त्यांची वेळ मिळण्यासाठी अनेक दिवस वाट पहावी लागते. आम्ही रुग्णालयात पोचलो, त्या वेळी मात्र ते तेथेच होते. ही मोठी गुरुकृपाच होती. त्यांनी लगेचच प्रियांकावर उपचार केले. तिच्या कपाळावर ९ इंच लांबीचा व्रण असल्याने ४० टाके घालावे लागले.
६. अपघाताविषयी कळल्यावर पत्नी स्थिर असणे आणि तिने भेटायला येणार्या नातेवाइकांना साधना सांगणे
अपघाताच्या वेळी माझी पत्नी सौ. शारदा पुण्याला तिच्या बहिणीकडे होती. तिला अपघाताविषयी कळल्यावरही ती अत्यंत स्थिर होती. तिने आम्हाला नामजपादी उपाय करण्याची आठवण करून दिली. नंतर ती कोल्हापूरला आली. अपघात झाल्याचे समजल्यावर आम्हाला भेटायला आमचे नातेवाईक येत होते. तेव्हा शारदा त्यांच्याशी ‘नामजपाचे महत्त्व, साधना केल्याने होणारे लाभ, अत्तर आणि कापूर यांद्वारे होणारे आध्यात्मिक स्तरावरील उपाय’ इत्यादी विषयांवर बोलायची. ‘आपत्काळाची तीव्रता आणखी वाढणार असून साधना करणे अत्यावश्यक आहे’, असेही ती त्यांना सांगत असे.
७. अपघाताच्या प्रसंगात आलेले कटू अनुभव !
अ. अपघाताच्या ठिकाणी पडलेला माझा भ्रमणभाष चोरीला गेला. गाडीत आमचे काही साहित्य होते, तेही लोकांनी चोरून नेले.
आ. आम्हा सर्वांचा आरोग्य आणि अपघात विमा आहे. आरोग्य विमाधारकांसाठी रुग्णालयात विनारोकड (कॅशलेस) उपचार घेण्याची विमा आस्थापनाची सुविधा आहे. आम्ही रुग्णालयात गेलो, त्या वेळी एवढ्या मोठ्या अत्याधुनिक रुग्णालयातील ही सेवा बंद होती. त्यामुळे १० दिवसांत रुग्णालयात व्यय झालेले सुमारे ४ लक्ष रुपये आम्हाला भरावे लागले. अपघात होऊन ३ मास उलटूनही या विम्याची रक्कम आम्हाला मिळाली नव्हती.
८. अनुभवलेली गुरुकृपा !
८ अ. प्राणघातक संकटातून वाचणे : अपघातग्रस्त वाहनाची स्थिती पहाणार्याला ‘या अपघातात काही जणांचा तरी मृत्यू झाला असावा’, असे वाटले असेल; मात्र गुरुकृपेने आम्ही चौघेही या प्राणघातक संकटातून वाचलो.
८ आ. वाहनरूपी देवतेने रक्षण केल्याचे जाणवणे : आम्ही वर्ष २०११ मध्ये ही गाडी घेतली. तेव्हापासून जाहीर सभा, गुरुपौर्णिमा, यज्ञयाग इत्यादी उपक्रमांच्या वेळी संत, साधक आणि सात्त्विक उत्पादने यांची ने-आण करण्याच्या सेवेत या गाडीचा सहभाग असे. गाडीत बसल्यावर आमचा नामजप चालू होत असे. या अपघातात जणू या वाहनरूपी देवतेनेच आमचे रक्षण केले.
‘एवढ्या मोठ्या संकटकाळात गुरुदेवांनीच आम्हा सर्वांमध्ये शरणागतभाव निर्माण केला. आमचे तीव्र प्रारब्ध सुसह्य केले. अधिकोशातील पैसा, ओळखी, प्रतिष्ठा, विमा या भौतिक सुविधांना मर्यादा असतात. गुरुकृपा मात्र सदैव आपल्या समवेत असते. गुरुदेवच आपल्याला सर्वतोपरी साहाय्य करतात’, याची जाणीव गुरुकृपेनेच आम्हाला झाली. ‘अशा अद्वितीय गुरुदेवांच्या चरणांची धूळ आमच्या मस्तकी अखंड राहो’, अशी आम्ही श्री भवानीदेवीच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करतो. आमच्यासारख्या सामान्य साधकांवर गुरुकृपेचा वर्षाव करणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. आनंद पाटील (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ५६ वर्षे), कोल्हापूर (२२.९.२०२४)
सौ. प्रियांका पाटील हिची जिद्द, तळमळ आणि गुरुदेवांवरील श्रद्धा !
१. गुरुदेवांना प्रार्थना करून अपघाताच्या दुसर्याच दिवशी विद्यापिठाला शोधनिबंध पाठवणे
सौ. प्रियांका (श्री. आनंद पाटील यांची सून) पुण्यातील ‘सी.ओ.इ.पी. टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ येथे ‘एम्. टेक. इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट’ या शाखेच्या अंतिम वर्षात शिकत होती. ३१.५.२०२४ या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत तिला तिच्या विषयाचा शोधनिबंध विद्यापिठात पाठवायचा होता. ‘अपघात झालेला असला, तरीही हे काम पूर्ण व्हावे’, यासाठी ती तळमळीने गुरुदेवांना प्रार्थना करत होती. ३१.५.२०२४ या दिवशी मी रुग्णालयातील आधुनिक वैद्यांची अनुमती घेतली आणि रात्री ११.१५ ते १२ या वेळेत प्रियांकाने रुग्णालयातूनच तिचा शोधनिबंध विद्यापिठाला ‘ऑनलाईन’ पाठवला.
२. रुग्णालयातून एका आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर करणे
त्यानंतर ६.६.२०२४ या दिवशी प्रियांकाला तिचा शोधनिबंध केरळ येथील एका आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर करायचा होता. तोपर्यंत प्रियांका बरी झालेली नव्हती. तिच्या डोक्याला पट्ट्या बांधलेल्या असतांना आणि तिला व्यवस्थित बसताही येत नसतांनाही तिने सादरीकरण करण्याचा निश्चय केला. गुरुदेवांचे स्मरण करून तिने रुग्णालयातील तिच्या खोलीतूनच प्रयत्नपूर्वक हे सादरीकरण केले.
३. परीक्षेत ‘विशेष योग्यता’ श्रेणीत उत्तीर्ण होणे
नंतर ‘या परीक्षेत प्रियांकाला ८० टक्के गुण मिळाले आणि ती ‘विशेष योग्यता’ श्रेणीत उत्तीर्ण झाली’, हे समजल्यावर आम्हा सर्वांचा भाव जागृत झाला. ‘गुरुकृपेमुळेच ती हे यश मिळवू शकली’, असे वाटून माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
– श्री. आनंद पाटील
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |