
कोल्हापूर, १७ एप्रिल (वार्ता.) – वैद्यकीय क्षेत्रात वर्ष १९८६ पासून कार्यरत असलेल्या उद्यमनगर येथील ‘वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल’ला ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘आयुष्यमान भारत’ योजना संमत झाली आहे. याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १८ एप्रिलला दुपारी १२.३० वाजता होणार आहे, अशी माहिती ‘श्री महालक्ष्मी हेल्थ फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. संतोष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी डॉ. वीरेंद्र वणकुद्रे उपस्थित होते.
श्री. संतोष कुलकर्णी म्हणाले, ‘‘या योजनेमध्ये अस्थिरोग, ‘पॉली ट्रॉमा’, नियमित शस्त्रकर्म, कान-नाक-घसा आणि मूत्ररोग यांचा समावेश आहे. लवकरच इतर आजारांच्या उपचारांच्या सोयींचा समावेश होणार आहे. त्याचसमवेत आता या ठिकाणी नेत्र, दंत चिकित्सा, ‘डिजिटल एक्स-रे’, सोनोग्राफी, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आणि सुसज्य अतीदक्षता विभाग कार्यरत आहे. वैद्यकीय उपचार सेवा समर्पित भावनेने कार्य करणारे कुशल आधुनिक वैद्य आणि सहकारी यांचे पथक कार्यरत आहे. तरी या कार्यक्रमास अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे.’’