सैनिकी (लष्करी) शिक्षणाचे महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धाकटे बंधु सुहास बाळाजी आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘माझा दोन वर्षांनी लहान भाऊ सुहास याचा हा त्याने शाळेत लिहिलेला लेख वाचल्यावर मला खूप आनंद झाला. आताच्या वयालाही मी असा लेख लिहू शकणार नाही !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘कोणताही देश घ्या, त्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारी वर्णांच्या लोकांची अत्यंत आवश्यकता असते. राष्ट्रातील जनतेची बौद्धिक पातळी उच्च करून त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ब्राह्मणवर्गावर येऊन पडते. देशाचे परचक्रापासून रक्षण करणे आणि अंतर्गत शांतता राखणे, हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. देशांत अधिक धान्य उपजवून जनतेचा पिंड पोसणे, हे वैश्याचे कर्तव्य आहे. ज्यांच्याकडून या तीन कामांपैकी कोणतेच काम होऊ शकत नाही, त्यांनी अंगमेहनतीची कामे करून राष्ट्राची सेवा करणे क्रमप्राप्त आहे.

डॉ. सुहास आठवले

राष्ट्राची प्रगती राष्ट्राच्या स्वातंत्र्यावर अवलंबून आहे आणि स्वातंत्र्याचे चिरस्थायित्व प्रामुख्याने राष्ट्रातील क्षात्रतेजावर अवलंबून आहे. आपण आपल्या भारताचेच उदाहरण घेऊ. भारतावर इंग्रजांचे दीड-दोनशे वर्षांपर्यंत राज्य होते. त्यामुळे आपणास आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही क्षेत्रांत प्रगती करता आली नाही. लष्करी शिक्षणाचे बाबतीत तर परकीय सरकारने हिंदू लोकांना हेतुपुरस्सर (मुद्दाम) अज्ञानात ठेवले. साधे शस्त्र वापरण्यास देखील परकीयांनी हिंदू लोकांना मनाई केली होती. सैन्यातील मोठमोठ्या अधिकारांच्या जागी इंग्रज लोकच विराजमान झाले होते. थोडक्यात ‘हिंदू प्रजा जास्तीत जास्त निःसत्त्व कशी होईल ?’, या करिता जेवढे भगीरथ प्रयत्न इंग्रज सरकारला करता येणे शक्य होते, तेवढे त्यांनी केले. परंतु स्वातंत्र्य मिळून चार-पाच वर्षे होत नाहीत तोच आपण बर्‍याच क्षेत्रांत प्रगती करू शकलो.

डॉ. सुहास आठवले यांच्या निबंधाचे हस्तलिखित

सैनिक शिक्षणास भारतात फार प्राचीन काळीही महत्त्वाचे स्थान होते, असे दिसून येईल. सध्याच्या युद्ध साधनांपेक्षा त्या काळातील युद्ध साधने भिन्न होती. त्या काळच्या गुरुकुल शिक्षणपद्धतीत धनुर्विद्या, गदाविद्या इत्यादी शिक्षणास प्रमुख स्थान होते. याची सुदर्शनचक्रधर श्रीकृष्ण, गदाधर भीम, धनुर्धर अर्जुन, हलधर बलराम इत्यादी वीर आपणास साक्ष पटवितात. ऐतिहासिक काळांतही लष्करी शिक्षणाची प्राचीन प्रथा कायम होती. सध्याच्या स्वतंत्र भारतास लष्करी शिक्षणाची फार आवश्यकता आहे आणि म्हणूनच भारत सरकार उत्पन्नापैकी जवळ जवळ निम्मे म्हणजे १७५ कोटी रुपये संरक्षणदलावर खर्च करीत आहे.

कुणी असे म्हणतील, ‘अगोदरच गेल्या दोन महायुद्धांमुळे जगातील काही राष्ट्रांची राखरांगोळी झाली आहे अन् सर्व जग युद्धवणव्यांत होरपळून निघाले आहे. मग राष्ट्रांनी सैनिकी संघटना उभारून युद्धप्रश्नास चालना का द्यावी ?’ या प्रश्नात काही तथ्य नाही; कारण मी असे म्हणतो, ‘लष्कर न उभारले तर युद्धे होणारच नाहीत, याची तरी हमी कोणी देऊ शकेल काय ?’ अर्थात् नाही. शिवाय लष्करी शिक्षण जे द्यावयाचे असते, ते इतर राष्ट्रांवर आक्रमण करण्याकरिता द्यावयाचे नसून, इतर राष्ट्रांनी आक्रमण केल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी द्यावयाचे असते. रोग अजिबातच होऊ न देणे, हा उत्तम मार्ग; पण तो झालाच, तर त्यावर आपण उपाय करतोच कि नाही ? त्याचप्रमाणे एका राष्ट्राने दुसर्‍या राष्ट्रावर आक्रमण न करणे, हा उत्तम मार्ग; पण तसे आक्रमण झाल्यास त्याकरिता प्रत्येक राष्ट्राने आपली सैनिकी दृष्ट्या सिद्धता करणे श्रेयस्कर नाही काय ? आजकाल ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने लहान राष्ट्रांचे मोलाचे स्वातंत्र्य नष्ट करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा काही बलवान राष्ट्रांत बळावत आहे. अशा राष्ट्रांशी शक्यतोवर साममार्गाने तोंड देऊन जागतिक शांतता टिकविण्यास मदत करणे, हा शहाणपणाचा मार्ग आहे; पण निरुपाय म्हणून कधी कधी ‘जशास तसे’ ही वृत्ती धारण करावी लागते. अशा वेळी दंडमार्ग अमलात आणणे, ही गोष्ट अवाजवी होणारी नाही.

विद्यार्थी राष्ट्राची भावी पिढी होय. विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांची गुणग्राहकशक्ती प्रखरतर असल्यामुळे त्यांना भूगोल आणि मराठी इत्यादी विषयांबरोबरच लष्करी शिक्षणाची माहिती देण्यात आली, तर राष्ट्राला बराच लाभ होईल. ज्या राष्ट्रातील नागरिकांत शिस्तीचा अभाव असतो, ते राष्ट्र रसातळास गेल्याशिवाय रहात नाही. मिशनरी लोक आपल्या धर्माचा प्रसार चिकाटीने करीत असल्यामुळे ‘मिशनर्‍यांची चिकाटी’ हा शब्दप्रयोग जसा रूढ झाला आहे, त्याचप्रमाणे ‘सैन्यातील शिस्त’ वाखाणण्यासारखी असल्याने ‘सैनिकी शिस्त’ हा शब्दप्रयोग प्रचारात आला आहे. सैनिकी शिक्षणामुळे पहिला आणि महत्त्वाचा जर कोणता गुण अंगी बाणत असेल, तर तो आहे शिस्त ! कणखरपणा, साहस, खिलाडू वृत्ती आणि प्रसंगावधान इत्यादी महत्त्वाच्या गुणांचा परिपोष होण्याकरिता विद्यार्थ्यांना अन् नागरिकांना सैनिकी शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

विद्यार्थी अन् नागरिक यांना सैनिकी शिक्षण देणार्‍या नॅशनल कॅडेट कोअर, होमगार्डस् इत्यादी संघटना सध्या भारतात अस्तित्वात आहेत, तरीही प्रत्येक माध्यमिक शाळा (हायस्कूल) आणि महाविद्यालय (कॉलेज) यांतील योग्य विद्यार्थ्यांना लष्करी शिक्षण सक्तीचे करणे राष्ट्राच्या दृष्टीने आवश्यक आहे.

‘शारीरिक शिक्षण हा सैनिकी शिक्षणाचा पाया आहे आणि सैनिकी शिक्षण हे केवळ राष्ट्राच्या संरक्षणाचेच नव्हे, तर व्यक्ती अन् समाज यांच्या उच्चतम गुणविकासाचे प्रधान अंग आहे’, हे लोकमान्य टिळकांचे उद्गार सैनिकी शिक्षणाचे महत्त्व दर्शवित नाहीत का ?’

– सुहास बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लहान बंधू)