ऋषींनी देवतांच्या जपात ‘नमः’, असा शब्दप्रयोग आवर्जून करण्यामागील आध्यात्मिक विश्‍लेषण !

‘ऋषींनी नामजपाची निर्मिती करतांना प्रत्येक देवतेच्या जपात ‘नमः’ या शब्दाचा उपयोग आवर्जून केला आहे, उदा. ‘श्री गणेशाय नमः ।’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, ‘श्री हनुमते नमः ।’ इत्यादी. ‘ऋषींनी असे का केले आहे ?’, याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. 

श्री. राम होनप

१. आदरभाव निर्माण होणे

देवता या सर्वव्यापक आणि सर्वशक्तीमान असतात. तेवढ्याच त्या कल्याणकारीही असतात; परंतु त्यांची कृपा संपादन करण्यासाठी देवतांप्रती साधकात प्रथम आदरभाव निर्माण व्हायला हवा. ‘नमः’ या शब्दाचा अर्थ ‘वंदन करतो’, असा आहे. जेव्हा साधक देवतेच्या प्रत्येक नामागणिक देवतेला ‘नमः’, असे म्हणून वंदन करतो, तेव्हा त्याच्यात देवतेप्रतीचा आदरभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

२. जवळीक, प्रेम आणि भाव उत्पन्न होणे

साधकाच्या मनात देवतेविषयी आदरभाव निर्माण झाल्यावर त्याला हळूहळू देवतेचे तत्त्व ग्रहण होऊ लागते. त्यामुळे त्याला देवतेचे तत्त्व अनुभवता येऊ लागते. परिणामी त्याच्यात देवतेविषयी जवळीक, प्रेम आणि भाव उत्पन्न होण्यास साहाय्य होते.

३. नम्रता येऊन अहं न्यून होणे

साधकाला नामाची गोडी लागली की, प्रत्येक जपाच्या वेळी ‘नमः’, असे म्हणतांना तो देवतेप्रती विनम्र होऊ लागतो. परिणामी साधकाच्या अंगी नम्रता येऊन हळूहळू त्याचा अहं न्यून होऊ लागतो.

४. ऋषींनी देवतांच्या जपांत ‘नमः’, असा शब्दप्रयोग करून ‘साधकाला देवतांशी लवकर जोडणे’ आणि ‘त्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुलभ करणे’, ही कार्ये केली आहेत.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.