दातागंज (उत्तरप्रदेश) येथील घटना
(‘गूगल मॅप’ म्हणजे इच्छित स्थळी जाण्यासाठी उपग्रहाच्या साहाय्याने भ्रमणभाषवर दाखवण्यात येणारा मार्ग)
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – गेल्या काही वर्षांमध्ये ‘गूगल मॅप’चा वापर करून इच्छित स्थळी जाणे आता नित्याचे झाले आहे. याचा काही प्रमाणात लाभ होतांना दिसतो, तर अनेक वेळा त्याच्यामुळे दिशाभूल होत असल्याचेही बहुतेकांनी अनुभवले आहे. असाच एक भयानक प्रकार राज्यातील खालपूर – दातागंज मार्गावर घडला. तिघे मित्र त्यांच्या गाडीतून ‘गूगल मॅप’ लावून एका लग्नाला चालले होते. तेव्हा मॅप दाखवत असलेल्या मार्गावरून पुढे जातांना एका अर्धवट बांधलेल्या पुलावर त्यांची गाडी पोचली आणि ती नदीत कोसळून तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
१. हे तरुण बरेलीहून बदायू जिल्ह्यातील दातागंज येथे जात होते. बांधकाम अर्धवट असलेल्या एका पुलावरून जात असतांना पूल संपल्यानंतर गाडी ५० फूट उंचीवरून थेट रामगंगा नदीत कोसळली, असे पोलिसांनी सांगितले.
२. अर्धवट बांधकाम झालेल्या अवस्थेत असलेल्या या पुलाच्या कडेला ‘बॅरिकेट्स’ही लावलेले नव्हते. त्यामुळे पूल अर्धवट बांधलेला आहे, हेही चालकाला कळले नाही आणि त्यामुळेच हा अपघात झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
संपादकीय भूमिकाआधुनिक तंत्रज्ञानावरील अवलंबित्वाचा अतिरेक जीवघेणा ठरत आहे, हेच या घटनेवरून दिसून येते ! |