४ दिवसांपासून करत आहेत आंदोलन
जम्मू (जम्मू-काश्मीर) – कटरा येथील वैष्णोदेवी रोपवे प्रकल्पाच्या विरोधात २५ नोव्हेंबरला स्थानिक दुकानदार आणि कामगार यांनी सलग चौथ्या दिवशी आंदोलन केले. आंदोलकांनी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एक पोलीस घायाळ झाला. आंदोलकांनी प्रथम दंडाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध मोर्चा काढला. त्यानंतर शालिमार पार्कबाहेर आंदोलन केले. येथे श्री वैष्णोदेवी दर्शनासाठी जाणार्या लोकांसाठी शालिमार पार्कमध्येच तळ बनवण्यात आला आहे. भाविकांना मंदिरापर्यंत नेण्यासाठी रोपवे प्रकल्पामुळे सध्याच्या मार्गावरील स्थानिक दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होईल, असा आंदोलकांचा आरोप आहे.
पालखी आणि घोडे यांवरून भाविकांना मंदिरात नेणार्या व्यापार्यांनी सांगितले की, रोपवे झाल्यानंतर भाविक त्यानेच जातील. ते पालखी आणि घोडे यांचा वापर करणार नाहीत. त्यामुळे आमचे उत्पन्न हिसकावून घेतले जाईल. रोपवे प्रकल्पामुळे रोजगार गमावलेल्या प्रत्येक नागरिकाला २० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याखेरीज बाधित लोकांसाठी पुनर्वसन योजना सिद्ध करण्यासही सांगितले आहे.
नवीन रोपवे प्रकल्पामुळे ७ घंट्यांचा प्रवास १ घंट्यात होणार !
श्री वैष्णोदेवी मंदिर श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग यांनी सांगितले की, २५० कोटी रुपये खर्चाच्या नवीन रोपवे प्रकल्पाला अनुमती मिळाली आहे. या अंतर्गत कटरा ते सांजीछत जाण्यासाठी केवळ ६ मिनिटे लागतील. यानंतर ४५ ते ५० मिनिटांत वैष्णो देवी भवन गाठता येते.
सध्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना ६-७ घंटे लागतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी अवघा १ घंटा लागणार आहे. रोपवे एका तासात १ सहस्र लोकांना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्यास सक्षम असेल.