महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडे केवळ ७२ घंट्यांचा अवधी !

छत्रपती संभाजीनगर – राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर या दिवशी मतदान पार पडले. यात मतदानोत्तर कल पाहिले, तर एक पक्ष, आघाडी किंवा युती यांना सत्ता स्थापन करता येईल, असे दिसून येत नाही. विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबर या दिवशी लागणार आहे, तर २६ नोव्हेंबर या दिवशी पूर्वीच्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे, त्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित केली जाईल. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडे केवळ ७२ घंट्यांचा अवधी आहे. तोपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा केला गेला नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.

महाराष्ट्रात आजपर्यंत ३ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. वर्ष २०१९ मध्ये ९ नोव्हेंबर या दिवशी विधानसभा विसर्जित करण्यात आली. राज्यपालांनी वेळ देऊनही तत्कालीन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. यानंतर १२ नोव्हेंबर या दिवशी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. राज्यघटनेच्या कलम ३५६ नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. राज्यघटनेच्या कलम ३५६ नुसार एखादे राज्य सरकार केंद्र सरकारच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ घोषित करणे शक्य असते.