चंद्रपूर – जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कढोली बु. येथे २० नोव्हेंबर या विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी गावकर्यांनी भाजपचे प्रचारक हरिचंद्र कोरडे (रा. घुघुस) आणि महादेव ठेंगणे यांना पैसे वाटप करत असतांना रंगेहात पकडले. ते दोघे मतदारांना पैसे आणि प्रलोभने यांचा वापर करण्याचा प्रयत्न करत होते. (अशांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)
या वेळी कोरडे आणि ठेंगणे यांच्याकडे मतदारांना पैसे वाटप करण्याचे पुरावे, प्रचार साहित्य, २ काळ्या पिशव्या आणि भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांच्या प्रचार नोंदवह्या सापडल्या. या वह्यांमध्ये ‘लाडक्या बहिणींचा लाडका दादा’, असे लिहिलेले आढळले. गावातील नागरिकांनी कोरडे यांना चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. या वेळी महादेव ठेंगणे पसार झाले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये हरिचंद्र कोरडे यांनी भाजपचे पदाधिकारी तथा राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश हिंगणे आणि इतर भाजप पदाधिकारी यांच्याशी संबंध असल्याचे मान्य केले आहे.