१. ‘गुरुदेव साधकांना त्यांच्या स्वप्नात भेटतात’, असे त्यांनी साधकाला सांगणे
‘मी एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत एका आरोग्यविषयक सेवेसाठी गेलो होतो. तेव्हा गुरुदेवांची प्राणशक्ती अत्यंत अल्प असल्यामुळे ते पलंगावर पहुडले होते. माझी सेवा चालू असतांना गुरुदेव मला सूत्रे सांगत होते आणि विचारतही होते. तेव्हा ते बोलता बोलता म्हणाले, ‘‘मला आता कुठे बाहेर जाता येत नाही; कारण माझी प्राणशक्ती अत्यंत अल्प झालेली आहे, तरीही मी स्वप्नामध्ये साधकांशी बोलतो.’ तेव्हा मी सेवेच्या घाईत असल्यामुळे गुरुदेवांचे वरील वाक्य केवळ ऐकले आणि सोडून दिले. रात्री घरी गेल्यानंतर माझा मुलगा श्री. स्वप्नील भोसले याला गुरुदेवांचे वरील वाक्य सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘हो बाबा, मलाही १ – २ वेळा स्वप्नात गुरुदेव साधकांना मार्गदर्शन करतांना दिसले; परंतु ते आता थकल्याप्रमाणे दिसत नव्हते, तर पूर्वी त्यांची प्रकृती चांगली असतांना दिसायचे तसे मला दिसले.’’ त्यानंतर माझी पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले हिलाही स्वप्नात तिला आणि साधकांना गुरुदेव मार्गदर्शन करतांना दिसले. अशाच प्रकारे मलाही २ वेळा स्वप्नात गुरुदेव साधकांना मार्गदर्शन करतांना दिसले. अशाच प्रकारे ‘गुरुदेव प्रसारातील आणि सर्वत्रच्या सनातन संस्थेच्या विविध आश्रमांमध्ये रहाणारे साधक यांना मार्गदर्शन करत आहेत’, असेही स्वप्न साधकांना पडले असेल’, असे मला वाटले.
२.‘गुरुदेव साधकांना त्यांच्या स्वप्नात भेटतात’, या वाक्याविषयी साधकाचे झालेले चिंतन
गुरुदेवांच्या वरील वाक्याविषयी मी चिंतन केल्यावर माझ्या असे लक्षात आले, ‘परात्पर गुरुदेव तर आपली गुरुमाऊली आहेत. आई लहान बाळाला त्याला ज्ञात नसतांनाही रात्री-अपरात्री उठून त्याला पाजत असते आणि त्याला ‘हवे-नको’ ते पहात असते. तो ४ – ५ वर्षांचा झाल्यावरसुद्धा तो खेळत असतांना ‘तो पडेल किंवा त्याला खरचटेल’, असा काळजीचा विचार ती करत असते. तो मुलगा मोठा झाल्यावर परगावी शिकण्यासाठी गेल्यावर वसतीगृहात राहून उच्च शिक्षण घेत असतांना ‘सणावारांच्या दिवशी माझ्या बाळाला गोड-धोड मिळत नाही’, या विचाराने तिला गोड घास घशाखाली उतरत नाही. त्याप्रमाणे आपली गुरुमाऊलीसुद्धा स्थुलातून आता बाहेर जाऊ शकत नसली, तरी ती सूक्ष्मातून प्रत्येक साधकाच्या सोबत असते. आपण ही अनुभूती दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वाचतो किंवा भक्तीसत्संगातून साधकांच्या तोंडून ऐकत असतो.
३. श्रीकृष्णाच्या जीवनातील एका प्रसंगाची साधकाला आठवण होऊन त्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये साम्य जाणवणे
आपली गुरुमाऊली प्रत्येक साधकाची त्याच्या कळत-नकळत त्याची काळजी घेत असते. त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी इतरांच्या माध्यमातून त्यांची अडचण सोडवून साहाय्य करत असते. यावरून मला भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भातील एक प्रसंग आठवला. ‘एकदा श्रीकृष्ण भोजन करत असतांना रुक्मिणीमाता त्यांना वारा घालत त्याच्या समोर बसली होती. तेव्हा भगवान श्रीकृष्ण जेवता जेवता एकदम ताटावरून उठून ४ – ५ पावले पुढे गेले आणि नंतर पुन्हा येऊन भोजनासाठी ताटावर बसले. तेव्हा रुक्मिणीमातेने त्यांना विचारले, ‘‘देवा, तुम्ही मध्येच उठून का गेला होता ?’’ तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘‘अगं माझा एक भक्त अडचणीत सापडला होता. तेव्हा तो माझा धावा करत होता. तेव्हा मी त्याच्या साहाय्यासाठी जाणार होतो; परंतु तितक्यात माझ्या दुसर्या एका भक्ताने माझ्या भक्ताला साहाय्य करून त्याची अडचण सोडवली. त्यामुळे मी परत येऊन जेवायला बसलो.’’ ‘अशा प्रकारे साधक गुरुमाऊलींना आर्ततेने प्रार्थना करतात, तेव्हा आपली गुरुमाऊलीसुद्धा सूक्ष्मातून कुणाच्यातरी माध्यमातून त्यांना साहाय्य करून त्यांची अडचण सोडवते’, अशी अनेक साधकांना प्रचीती आली आहे.
अशा प्रकारे आपल्या गुरुमाऊलीसाठी साधकच त्यांचे जीव कि प्राण आहे. त्यामुळे ते रात्रंदिवस आणि २४ घंटे सतत साधकांचाच विचार करत असतात. ‘साधकांची आध्यात्मिक प्रगती कशी होईल ?’, याचाच ध्यास त्यांना लागलेला असतो. त्यामुळेच ‘गुरुदेव वरील वाक्य माझ्याशी बोलले’, असे मला वाटते.
४. कृतज्ञता
हे सर्व विचार गुरुदेवांनीच मला सुचवले आणि लिहून घेतले, यासाठी मी त्यांच्या चरणी ही शब्दसुमने कृतज्ञताभावाने अर्पण करतो.’
– श्री गुरुचरणसेवक, आधुनिक वैद्य (डॉ.) भिकाजी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२४)
|