विश्वस्तांकडून मंदिर परिसरात पाडकाम चालू !
सोलापूर – लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गुड्डापूर (तालुका जत, जिल्हा सांगली) येथील श्री दानम्मादेवी मंदिराच्या विश्वस्तांकडून तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मिळालेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर परिसरात विकासकामे करण्यास प्रारंभ केला आहे; मात्र याला भाविक श्री. विजयकुमार बिराजदार यांनी विरोध दर्शवून तशी तक्रार पुरातत्व विभागाकडे केली होती. त्यानंतर मंदिर पाडण्यास पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाने मनाई केली आहे. त्यामुळे नवीन मंदिर बांधण्यासाठी ऐतिहासिक वारसा नष्ट करता येणार नाही.
१. श्री दानम्मादेवीचे मंदिर १२ व्या शतकातील आहे. या मंदिर परिसरात वीरभद्र, सोमनाथ आणि मल्लिकार्जुन मंदिरसमूह आहे. दक्षिण भारतीय शैलीतील त्रिकूट पद्धतीच्या या मंदिरात प्राचीन म्हणजे श्री दानम्मादेवीच्या जन्माआधीची विहीर आहे.
२. हे लाखो लोकांचे धार्मिक श्रद्धाकेंद्र असून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसास्थळ आहे; मात्र विकासाच्या नावाखाली मंदिराच्या विश्वस्तांनी हे मंदिर पाडून तेथे नव्याने मंदिर बांधण्याचा आणि श्री दानम्मादेवीच्या स्मृती जपणारी ही विहिरही बुजवण्याचा घाट घातला आहे.
३. श्री दानम्मादेवी मंदिराच्या विश्वस्तांकडून तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मिळालेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर परिसरात विकासकामे चालू आहेत. ऐतिहासिक मंदिर पाडून तेथे नव्याने मंदिर बांधण्याचा घाट विश्वस्तांनी घातला आहे.
४. या विरोधात खानापूर (तालुका दक्षिण सोलापूर) येथील भक्त श्री. विजयकुमार बिराजदार यांनी पुणे येथील पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालयाचे विभागीय संचालक यांच्यासह कोल्हापूर येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सांगली येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
५. त्यावर पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे यांनी १९ नोव्हेंबर या दिवशी मंदिर पाडण्याविषयी मनाई आदेश काढला आहे. ‘हे मंदिर प्राचीन असल्याने त्याच्या मूळ स्वरूपानुरूप जतन होणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव मंदिराचे पाडकाम चालू असल्यास ते तात्काळ थांबवावे. मंदिरात कोणतेही फेरपालट आणि आधुनिक स्वरूपाचे काम करू नये, तसेच भविष्यात पुरातत्व विभागाच्या अनुमतीविना कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये’, असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.
श्री दानम्मादेवीचे मंदिर हे पुरातन आहे. पुरातन मंदिरात नवीन बांधकाम करता येत नाही, याची माहिती विश्वस्तांना असतांनाही त्यांनी मंदिरातील बांधकाम पाडून तेथे नवीन बांधकाम चालूच कसे केले ? अशी कामे करून यातून भ्रष्टाचार करण्याचा संशय दिसून येत नाही का ? तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मिळालेल्या पैशांचा मंदिराच्या अन्य विकासकामांवर व्यय करता येतो; मात्र विश्वस्तांचा मनमानी कारभार यातून दिसून येतो ! |
श्री दानम्मा मंदिराचा काही भाग पाडून बांधकाम !श्री दानम्मादेवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी ऐतिहासिक मंदिराभोवती नैवेद्य बनवण्यासाठी खोल्या होत्या. समितीने त्या पाडून तेथे ‘सिमेंट काँक्रीट’चे बांधकाम केले आहे. मंदिर परिसरात अजून बांधकाम चालू आहे. (कायद्यानुसार पुरातन मंदिरात नवीन बांधकाम करता येत नसतांनाही केवळ नवीन कामे दाखवून पैसे लाटण्यासाठी मंदिर परिसरात अशी कामे चालू आहे, असे म्हटल्यास त्यात चूक काय ? – संपादक) |
महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनी नवीन बांधकामाला विरोध करावा !मंदिर विश्वस्तांनी प्राचीन मंदिर पाडून तेथे नवीन मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंदिर परिसरात पाडकाम चालू आहे. विकासाच्या नावाखाली गर्भगृहासह मंदिर पाडण्याचा आणि दानम्मादेवीच्या स्मृती जपणारी विहीर बुजवून ऐतिहासिक वारशाला नख लावण्याचा हा प्रयत्न आहे. त्याला पुरातत्व विभागाने मनाई केली आहे; मात्र या विरोधात महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनीही कडाडून विरोध करण्याची आवश्यकता आहे. – श्री. विजयकुमार बिराजदार, भाविक आणि तक्रारदार, खानापूर, तालुका दक्षिण सोलापूर. |