तत्त्वनिष्‍ठता हवीच !

लोकशाहीची व्‍याख्‍या आपण सगळेच जाणतोच; पण सध्‍याची अस्‍थिर झालेली राजकीय स्‍थिती पहाता लोकांनी, लोकांसाठी, लोकांची असणारी हीच का ती लोकशाही ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे; कारण काही टक्‍क्‍यांमध्‍ये झालेल्‍या मतदानातून काही ठराविक व्‍यक्‍तींच्‍या हाती देशाचा किंवा राज्‍याचा कारभार दिला जातो. त्‍यातही सत्तास्‍थापन करतांना अमुक एक पद मिळण्‍यासाठी होणारी चढाओढ वेगळीच, अन्‍यथा पाठिंबा काढून घेण्‍याचा पर्याय आहेच. यात जनतेची सेवा येते कुठे ? भारत जरी ‘धर्मनिरपेक्ष’ असला, तरी देशातील हिंदूंमुळे धर्मनिरपेक्षता टिकून आहे, हे त्रिवार सत्‍य आहे. ज्‍या क्षणी हिंदू अल्‍पसंख्‍य होतील, तो क्षण किती भयंकर असेल, याची कल्‍पना अन्‍य देश आणि राज्‍ये येथे होणार्‍या अत्‍याचारांवरून दिसून येते. थोडक्‍यात काय, तर क्रांतीकारकांच्‍या बलीदानाने मिळालेले हे ‘स्‍वातंत्र्य’  टिकवण्‍यासाठी आता ‘सुराज्‍य’ म्‍हणजे ‘हिंदु राष्‍ट्र’च हवे.

आज अनेक नेतेमंडळींची होणारी पक्षांतरे पहाता ते देश किंवा धर्म यांच्‍या दृष्‍टीने काहीतरी विचार करत असतील, असे वाटत नाही. त्‍यामुळे पक्षनिष्‍ठा, तत्त्वनिष्‍ठा हे शब्‍दच त्‍यांच्‍या शब्‍दकोशात नसतील. अशांच्‍या हाती सत्ता देऊन काय उपयोग आहे ? ज्‍या विचारसरणीने आपण मतदान केले होते, ती विचारसरणीच प्रवाहाच्‍या विरुद्ध फिरली. त्‍यामुळे आताचे मतदान हे नागरिकांकडून अत्‍यंत तत्त्वनिष्‍ठतेने होणे आवश्‍यक आहे, जो देशाचा किंवा धर्माचा विचार करील, त्‍याला मत देणे योग्‍य ठरू शकते. सध्‍याची स्‍थिती पालटण्‍यासाठी बहुसंख्‍य हिंदूंचे योग्‍य मतदान हा शेवटचा पर्याय आहे. हिंदूंनी बहुसंख्‍येने मतदान करावे, यासाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्‍यमातून जागृती करण्‍यात येत आहे. देव, देश, धर्म, संस्‍कृती यांच्‍या रक्षणासाठी मतदानाची साद घातली जात आहे. त्‍या सादेला उत्तम प्रतिसाद देणे, हे प्रत्‍येक धर्म आणि राष्‍ट्र निष्‍ठ नागरिकाचे दायित्‍व आहे. ‘आज नाही, तर कधीच नाही’, अशी भयानक स्‍थिती निर्माण झाली आहे. त्‍यामुळे हिंदूंचे कृतीशील पाऊलच आता अपेक्षित आहे.

जो देशाशी खर्‍या अर्थाने प्रामाणिक असेल, त्‍या उमेदवाराने संपूर्ण देश आपल्‍याला मते देत आहे, याची जाणीव कायम ठेवली पाहिजे. आपल्‍याला देव, देश, धर्म आणि संस्‍कृती यांच्‍या रक्षणासाठी निवडलेले आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे. निवडणुकीनंतर सत्तास्‍थापनेसाठी पक्षांतरे होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही; मात्र त्‍यामध्‍ये ‘तत्त्वनिष्‍ठता’ अबाधित कशी राहील, या प्रत्‍येकाने विचार करायला हवा. मतदारराजांनी मोठ्या विश्‍वासाने आपल्‍या दिलेले दायित्‍व आपण योग्‍य पद्धतीने पार पाडत आहोत ना, याकडे लक्ष दिले पाहिजे. नागरिकांनी डोळसपणे लक्ष ठेवावे अन् भारतात ‘लोकशाही’ अबाधित ठेवण्‍यासाठी प्रयत्न करावेत.

– सौ. स्नेहा ताम्‍हनकर, रत्नागिरी.