अनुसंधान हा देहस्‍वभावच व्‍हावा !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

एकदा एका प्राध्‍यापकांचे अनुसंधानावर प्रवचन झाले. नंतर श्रीमहाराजांनी (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराजांनी) एका प्रौढ बाईंना विचारले, ‘अनुसंधान म्‍हणजे काय, ते कळले ना ?’ बाई म्‍हणाल्‍या, ‘विषय जरा अवघडच होता; पण सोप्‍या भाषेत समजेल आणि लक्षात ठेवण्‍यास सोपे जाईल, असे आपण सांगावे.’ त्‍यावर श्रीमहाराज म्‍हणाले, ‘स्‍त्रियांना अनुसंधान म्‍हणजे काय, ते लक्षात ठेवणे अगदी सुलभ आहे. कुलीन स्‍त्रीचे लक्ष सदा पदराकडे असते. कितीही घाई असली, कितीही मुले अंगावर खेळत असली, तरी बाईचे पदराकडे कधी दुर्लक्ष होत नाही. पदराकडे लक्ष ठेवणे, हा तिचा देहस्‍वभावच होऊन बसतो. स्‍त्रीची ही जी अवस्‍था होते, ती साधकाची नामाविषयी होणे अगर भगवंताच्‍या स्‍मरणाविषयी होणे, यालाच ‘भगवद़्‍अनुसंधान’ म्‍हणतात. ज्‍याप्रमाणे पदराकडे लक्ष असते, त्‍याप्रमाणे नामाकडे लावणे, हे स्‍त्रीवर्गाला खरोखर सोपे आहे.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांच्‍या हृद्य आठवणी’ या पुस्‍तकातून, लेखक : ल.ग. मराठे)