जमावाकडून ‘अल्ला हू अकबर’ अशी घोषणा देत माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत धुडगूस; आसंद्यांची तोडफोड !

खल्लार (अमरावती) येथील घटना !

(‘अल्ला हू अकबर’ म्हणजे अल्ला सर्वश्रेष्ठ आहे.)

जमावाचा सभेतील प्रेक्षकांमध्ये घुसून धुडगूस

अमरावती – जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार रवी राणा यांच्या पत्नी आणि भाजपच्या माजी खासदार सौ. नवनीत राणा यांची १६ नोव्हेंबर या रात्री दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात प्रचारसभा आयोजित केली होती; मात्र रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक एका जमावाने सभेतील प्रेक्षकांमध्ये घुसून धुडगूस घातला, तसेच ‘अल्ला हू अकबर’ अशी घोषणाही दिल्या. सभास्थानी असलेल्या आसंद्यांची तोडफोड केली. आक्रमणकर्त्यांवरील कारवाईच्या मागणीसाठी नवनीत राणा पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्या होत्या. या घटनेनंतर गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, ‘‘सभा झाल्यावर मी सर्वांना भेटत होते. त्या वेळी ‘तुला मारून टाकू, कापून काढू, आम्ही अल्लाहची माणसे आहोत’, असे काही जण बोलत होते. मी त्यांना शांत रहाण्यास सांगितल्यावर ते सर्व जण आक्रमक झाले. काहींनी माझ्यावर थुंकण्याचाही प्रयत्न केला.’’

नवनीत राणा यांच्याकडून तक्रार प्रविष्ट (दाखल) !

आमदार रवी राणा म्हणाले की, पोलीस संरक्षणात सभेला गेलेल्या सौ. नवनीत राणा यांच्यावरही आक्रमणाचा प्रयत्न झाला. त्यांच्या दिशेने आसंद्या फेकण्यात आल्या. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही; मात्र पोलिसांना इजा झाली. या प्रकरणाची चौकशी चालू केल्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले. नवनीत राणा यांच्याकडून खल्लार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

आरोपींना अटक न झाल्यास हिंदु समाज रस्त्यावर उतरेल ! – नवनीत राणा

माजी खासदार सौ. नवनीत राणा म्हणाल्या, ‘‘आम्ही शांततेत आमचा प्रचार करत होतो; मात्र भाषणाच्या वेळी विचित्र पद्धतीने खाणाखुणा केल्या जात होत्या. माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याच्या प्रयत्न केला; मात्र त्यांनी अचानक आमच्यावर आक्रमण केले. माझे कार्यकर्ते आणि अंगरक्षक यांनी मला सुरक्षितरित्या तेथून बाहेर काढले. या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक न झाल्यास संपूर्ण हिंदु समाज रस्त्यावर उतरेल.’’