रामनाथी, गोवा येथील आश्रमातील ‘साधकत्व वृद्धी’ शिबिरात साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ८ ते ११.८.२०२४ या कालावधीत ‘साधकत्व वृद्धी’  शिबिर पार पडले. त्या वेळी शिबिरार्थी साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. सौ. भार्गवी क्षीरसागर, वर्धा

१. ‘गेल्या अनेक वर्षांपासून मी सेवा करत आहे; परंतु सेवेत मी माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर करत नाही’, असे विचार माझ्या मनात होते. या शिबिरातून माझ्या मनात नवीन उत्साह निर्माण झाला.

२. माझा प्रत्येक सेवेचा विस्तृत अभ्यास झाला आणि ‘प्रत्येक प्रश्नावर उपाययोजना आहे’, हा विचार दृढ झाला.

३. ‘आपल्या मनातील विचारांमुळे आपण शिबिरातील विषय ग्रहण करायला न्यून पडतो. त्यामुळे ‘शिबिरात पूर्ण लक्ष केंद्रित करून सर्व विषय नीट समजून आणि शिकून घ्यायचे आहेत’, हे मला शिकायला मिळाले.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सर्व सद्गुरु आणि संत साधकांच्या बोलण्याकडे सतर्कतेने लक्ष देतात अन् ‘योग्य दृष्टीकोन साधकांना कळावेत’, यासाठी तळमळीने प्रयत्न करतात. ‘देवालाच मला पुढे नेण्याची तळमळ आहे’, हे पाहून माझी पुष्कळ भावजागृती होत होती.’

२. साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

२ अ. सौ. पुष्पा सावंत, इंदूर, मध्यप्रदेश.

२ अ १. ‘प.पू. गुरुदेव आपल्यासमोर सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले आहेत’, असा भाव ठेवल्याने सर्व सूत्रांचे आकलन होणे : ‘शिबिरात सूत्रसंचालिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी एका भावप्रयोगात सांगितले, ‘‘प.पू. गुरुदेव आपल्यासमोर सुवर्ण सिंहासनावर साक्षात् विराजमान झाले आहेत.’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आज आपण ध्येय ठेवून भावाचे प्रयत्न करूया.’

‘शिबिरात उत्तरदायी साधक, संत आणि सद्गुरु जी सूत्रे आम्हाला सांगत आहेत, ती सूत्रे प.पू. गुरुदेवांच्या चैतन्यमय वाणीतून आलेली आहेत’, असा मी भाव ठेवला. त्यामुळे त्या दिवशी मला शिबिरातील सर्व सूत्रांचे आकलन होऊन ती माझ्या अंतर्मनात जात होती.

२ अ २. ‘प.पू. गुरुदेव श्रीकृष्णरूपात असून स्वतः गोपी आहे’, असा भाव ठेवणे : ‘श्रीकृष्ण अवतारात गोपी त्याचे ओझरते तरी दर्शन व्हावे’, यासाठी किती आतुर व्हायच्या ! ‘आज प.पू. गुरुदेव श्रीकृष्णरूपात माझ्यासमोर बसले आहेत, तर मीसुद्धा ‘गोपी होऊन त्यांचे ओझरते तरी दर्शन व्हावे’, यासाठी प्रयत्न करीन’, असा मी भावप्रयोग केला. मी आजच्या शिबिरात सांगितली जाणारी सर्व सूत्रे ग्रहण करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यामुळे शिबिराच्या अंतिम दिनीही मला सतर्क राहून सर्व सूत्रे नीट समजून घेता आली. ‘प.पू. गुरुदेवांचे चैतन्य मी ग्रहण करू शकले’, याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

२ आ. सौ. दीपाली सिंगाभदी, चंद्रपूर

१. ‘शिबिरात प्रार्थना झाल्यानंतर जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा मला वातावरणात पुष्कळ प्रमाणात प्रकाश जाणवत होता.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना ‘प.पू. गुरुदेवच बोलत आहेत’, असे मला जाणवत होते.

३. सर्व सद्गुरु आणि संत बोलत असतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती.

४. भावप्रयोग झाल्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘काय जाणवले ?’, असे विचारल्यावर ‘‘अनेक विचारांनी व्यापलेले माझे मन शांत आणि स्थिर झाले आहे’, असे वाटून मला चैतन्याची अनुभूती येत आहे’’, असे मी सांगितले.

५. अंतिम सत्राला आरंभ झाल्यावर १५ ते २० मिनिटे माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते. ‘आपण एका वेगळ्याच जगात आहोत’, असे मला जाणवत होते.

‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला अनेक सद्गुरु आणि संत यांच्या सान्निध्यात ३ – ४ दिवस रहाता आले. प.पू. गुरुदेवांनी या शिबिरात मला सहभागी करून घेतले’, याबद्दल प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२ इ. सौ. शिल्पा किचंबरे, रायगड

२ इ १. प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्राच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

अ. ‘रामनाथी आश्रमात प्रवेश केल्यावर ‘मी दैवी लोकात आले आहे’, असे मला वाटले. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला नमस्कार करून मी प्रार्थना करू लागले. त्या वेळी मला त्यांच्या छायाचित्रातून सूक्ष्मातून प्रकाशाचे किरण वेगाने माझ्या आज्ञाचक्रात आल्याचे जाणवले आणि मला आज्ञाचक्राच्या ठिकाणी एकदम हलके वाटू लागले.

आ. ‘तो प्रकाश माझ्या शरिरातील पेशीपेशींत जाऊन ‘माझे पूर्ण शरीर प्रकाशमान झाले आहे’, असे मला जाणवले.

इ. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात सजीवपणा जाणवून जणू ‘ते माझ्याशी बोलत आहेत’, असे मला वाटले.

२ इ २. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ बोलत असतांना त्यांच्यामध्ये ‘श्री महालक्ष्मीदेवी’चे दर्शन होणे : शिबिरातील एका सत्रात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ व्यासपिठावर बसल्या होत्या. त्या वेळी त्यांच्यामध्ये मला श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन होत होते. त्यामुळे मला ‘त्यांच्याकडे बघत रहावे’, असे वाटत होते. त्या बोलत असतांना त्यांच्या प्रत्येक शब्दातून साधकांवर असलेली त्यांची प्रीती मला जाणवली. ‘सर्व साधक बालके आहेत आणि त्या सर्वांची मातेप्रमाणे काळजी घेत आहेत’, असे मला जाणवले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १४.८.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक