Diwali In US : अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर कॅपिटॉल हिल येथे साजरी करण्यात आली दिवाळी !

कॅपिटॉल हिल येथे साजरी करण्यात आली दिवाळी

वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्या आठवड्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर १३ नोव्हेंबरला अमेरिकेत एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर येथील यू.एस्. कॅपिटॉल हिलमध्ये १४ हून अधिक कायदेतज्ञ आणि प्रख्यात भारतीय अमेरिकी लोकांनी दिवाळी साजरी केली.

१. कॅपिटॉल हिल येथे प्रतिवर्षी दिवाळी साजरी केली जाते. या वेळी हा कार्यक्रम श्री स्वामीनारायण मंदिराने ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’, ‘सिख फॉर अमेरिका’, ‘जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संघटनांसह इतरही अनेक भारतीय अमेरिकी संस्थांच्या सहकार्याने आयोजित केला होता.

२. यू.एस्. काँग्रेसचे सदस्य डॅन म्युझर यांनी एक्सवर छायाचित्र पोस्ट करतांना म्हटले आहे की, कॅपिटॉल हिलवर दिवाळी आणि हिंदु नववर्ष साजरे करण्यासाठी श्री स्वामीनारायण मंदिर अन् अनेक भारतीय-अमेरिकी संस्थांमध्ये सहभागी होऊन आनंद झाला. एक अब्जाहून अधिक लोकांद्वारे साजरा केला जाणारा दिवाळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि तो श्रद्धा, कुटुंब अन् समुदाय यांच्या मूल्यांना प्रोत्साहन देतो.

३. दिवाळीच्या उत्सवाविषयी सिनेटर (खासदार) रँड पॉल म्हणाले की, अमेरिका स्थलांतरितांचा देश आहे, जो जगभरातील सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी लोकांना आकर्षित करतो. हे लोक मिळून अमेरिकेला महान देश बनवतात.

४. मिसिसिपीच्या सिनेटर सिंडी स्मिथ हाइड यांनी भारतीय अमेरिकनांना दिवाळीच्या शुभेच्छा देतांना सांगितले की, पुढील ४ वर्षांत देशाच्या समृद्धीची मला आशा आहे. आम्हाला स्थिर वातावरण हवे आहे. आम्हाला मोठी अर्थव्यवस्था हवी आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला आधार द्यावा, अशी आमची इच्छा आहे.

५. भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की, दिवाळी सण जगभरात साजरा केला जातो. येथील दिवाळी कार्यक्रमात अनेक खासदारांची उपस्थिती या सणाप्रती त्यांची बांधिलकी दर्शवते.

६. मिशिगनमधून पुन्हा निवडून आलेले खासदार श्री. श्री ठाणेदार म्हणाले की, माझ्या पहिल्या कार्यकाळात संसदेच्या इतिहासात प्रथमच हिंदु, शीख, जैन आणि बौद्ध कॉकसची (गटाची) स्थापना झाली. अमेरिकेतील हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात परराष्ट्र विभागासमवेत मी काम करत आहे.

७. खासदार राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, भारतीय अमेरिकी समुदाय अमेरिकेतील सर्वांत वेगाने वाढणारा अल्पसंख्यांक समुदाय आहे. तसेच तो सर्वांत शिक्षित आणि समृद्ध आहे. प्रत्येक ७ डॉक्टरांपैकी एक मूळचा भारतीय आहे.