१. समंजस
‘श्रीराम हा लहापणापासूनच समंजस आहे. त्याने कधीही कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही.
२. इतरांना साहाय्य करणे
अ. पूर्वी मी अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी बाहेर जायचे. मी घरी आल्यावर तो मला नेहमी स्वयंपाक करण्यासाठी साहाय्य करत असे. बर्याच वेळा सनातनचे संत आमच्या घरी निवासासाठी यायचे. तेव्हा श्रीराम ‘घराची स्वच्छता करणे, साहित्य आणून देणे’, अशा सेवा करत असे. मी घरी नसतांना अन्य साधक किंवा समाजातील व्यक्ती आली, तर तो त्यांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना चहा किंवा महाप्रसाद घेण्याविषयी विचारत असे.
आ. तो कोकणात आजी-आजोबांच्या घरी गेल्यावर त्यांची मनापासून सेवा करत असे. त्यामुळे आजी-आजोबा श्रीराम घरी येण्याची वाट बघायचे. सांगलीला महाविद्यालयीन शिक्षण घेतांना तो ज्या आजी-आजोबांकडे रहायचा, त्यांनाही साहाय्य करायचा. तो पुण्यामध्ये ज्या खानावळीत जेवत असे, त्या खानावळीतही तो साहाय्य करत असे. त्यामुळे तो त्यांच्या घरातीलच एक होऊन जात असे.
३. धर्माचरण करणे
श्रीरामचा विवाह झाल्यावर त्याला अनेक लोक भेटायला आले होते. तेव्हा हस्तांदोलन न करता त्याने सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि त्यांनाही नमस्कार करण्याचे महत्त्व सांगितले.
४. जाणवलेले पालट
४ अ. पूर्वीपेक्षा उत्साही वाटणे : पुणे येथील माझी मुलगी सौ. प्रगती वीरकर (श्रीरामची बहीण) मला म्हणाली, ‘‘श्रीराम आता पूर्वीपेक्षा अधिक उजळ आणि उत्साही वाटत आहे.’’
४ आ. मायेतील गोष्टींविषयी न बोलता साधनेविषयी बोलणे : जेव्हा श्रीराम माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मला भ्रमणभाष करत असे, तेव्हा तो नेहमी व्यष्टी साधना, आश्रमातील सेवा यांसंदर्भातच बोलत असे. कौटुंबिक किंवा मायेतील गोष्टींविषयी तो विशेष विचारणा करत नसे.’
– सौ. रोहिणी रमेश लुकतुके (श्री. श्रीराम लुकतुके यांची आई), कोल्हापूर (२७.७.२०२४)