अभ्यासू वृत्ती आणि नामजपादी उपायांचे गांभीर्य असलेल्या कु. निधि देशमुख (वय ३८ वर्षे) !

१२.११.२०२४ (कार्तिक शुक्ल एकादशी) या दिवशी कु. निधि देशमुख यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा भाऊ सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि जाणवलेला पालट पुढे दिला आहे.

कु. निधी देशमुख

कु. निधि देशमुख यांना ३८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. निषाद देशमुख

१. अभ्यासू वृत्ती 

‘कु. निधिताई सनातनचे ग्रंथ आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिके यांसाठीच्या मराठीतील लिखाणाचे हिंदीत भाषांतर करण्याची अन् हिंदी भाषेच्या दृष्टीने लिखाण अंतिम करण्याची सेवा करते. तिच्या अभ्यासू वृत्तीमुळे तिला अनेक विषयांतील अनेक सूत्रे ठाऊक असतात. ही सर्व माहिती ती अत्यंत सोप्या भाषेत इतरांना समजावून सांगते. त्यामुळे अनेक साधकांना तिचा आधार वाटतो.

२. शीघ्र कवयित्री 

अनेकदा संत किंवा साधक यांच्या वाढदिवसासाठी हिंदी भाषेत काव्य हवे असल्यास संबंधित साधक ताईला संपर्क करतात. ब्रह्मोत्सवस्थळी मैदानात उभारण्यात आलेल्या कमानींसाठी हिंदी भाषेतील विविध काव्ये हवी होती. अनेक वेळा त्या संदर्भात सेवा करणार्‍या साधकांकडून ‘लगेच नवीन काव्य हवे’, अशी मागणी यायची. तेव्हा भ्रमणभाषवर त्या साधकाशी बोलता-बोलता ताई यमक जुळणारे आणि सर्वसामान्य साधकाला अर्थबोध होईल, असे काव्य करायची. हे काव्य अनेक संत आणि साधक यांनाही पुष्कळ आवडायचे.

३. अनेक सेवा सांभाळून नामजपादी उपाय गांभीर्याने करणे 

ताई विविध प्रकारच्या सेवा करते. आमच्या आईला (सौ. क्षिप्रा देशमुख यांना (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ७३ वर्षे) यांना)) हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे तिला अंघोळ घालणे इत्यादी सेवा ताईलाच कराव्या लागतात, तसेच मला विविध सेवांसाठी लागत असलेले साहाय्यही ती करते. एवढे सर्व करूनही ती तिला सांगितलेला ३ घंटे नामजप पूर्ण करते.

४. जाणवलेला पालट

४ अ. भावनाप्रधानता न्यून होऊन तत्त्वनिष्ठेने वागण्यासाठीचे प्रयत्न होणे : पूर्वी तिला साधकांच्या चुका सांगता येत नव्हत्या. आता संतांचे मार्गदर्शन आणि तिची साधना यांमुळे तिच्यातील ‘भावनाप्रधानता’ हा स्वभावदोष न्यून झाला आहे. त्यामुळे ती उत्तरदायी साधकांना वेळोवेळी सेवेतील सर्व अडचणी कळवून त्यांचे साहाय्य घेते, तसेच साधकांना साधनेत साहाय्य व्हावे; म्हणून तिने त्यांच्या चुका तत्त्वनिष्ठेने सांगणे चालू केले आहे.’

– श्री. निषाद देशमुख (कु. निधि यांचा भाऊ, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के (वय ३६ वर्षे)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२४)