|
पिंपरी (पुणे) – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहनांची झडती घेतली. त्यामध्ये अवैधरित्या वाहतूक करत असलेली ७९ लाख ६६ सहस्र रुपयांची रोकड, १७ लाख रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. (ही पकडण्यात आलेली रक्कम आणि अमली पदार्थ आहेत, न पकडण्यात आलेले किती असतील ? याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक) त्यातून १ सहस्र ४३८ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पिंपरी-चिंचवड, भोसरी, मावळ, भोर-वेल्हा-मुळशी, वडगाव शेरी, खेड-आळंदी या मतदारसंघांचा समावेश होतो. शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश असून भौगोलिकदृष्ट्या हद्द मोठी आहे. वाहनांच्या पडताळणीसाठी १७ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यात ३६ अधिकारी आणि १०२ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत ६ गुन्हेगारी टोळ्यांमधील २८ आरोपींच्या विरोधात ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत’ (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. त्यातील ६ जणांना स्थानबद्ध केले आहे.