मुंबई, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र विधानसभेत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे नेते मनोज तिवारी, नेत्या स्मृती इराणी हे केंद्रातील मोठे नेते महाराष्ट्रात सभा घेत आहेत. विशेष म्हणजे प्रचार जलदगतीने आणि धडाडीने व्हावा, यासाठी हे सर्व नेते राज्यात स्वतंत्र सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही नेते महायुतीच्या प्रचारासाठी राज्यात स्वतंत्रपणे सभा घेणार आहेत.
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ नोव्हेंबर या दिवशी नाशिक येथे सभा झाली. या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी हे ९ नोव्हेंबर या दिवशी अकोला आणि नांदेड, १२ नोव्हेंबर या दिवशी चिमूर, सोलापूर येथे सभा आणि पुणे येथे ‘रोड शो’, तर १४ नोव्हेंबर या दिवशी छत्रपती संभाजीनगर, रायगड अन् मुंबई येथे सभा घेणार आहेत.
योगी आदित्यनाथ १३ नोव्हेंबर या दिवशी भोकरदान (जालना), उल्हासनगर (ठाणे), मीरा भाईंदर (पालघर) आणि मुंबई येथे सभा घेणार आहेत.
अमित शहा यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे सभा घेतली. मुंबईतील उत्तरप्रदेश आणि बिहार येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपचे नेते मनोज तिवारी यांच्या मुंबई अन् पालघर येथे सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.