ढाका (बांगलादेश) : बांगलादेशात अंतरिम सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांत बांगलादेशाच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सर्व सदस्यांनी त्यागपत्र दिले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कमालुद्दीन अहमद आणि इतर ५ सदस्य यांनी नुकतेच राष्ट्रपतींकडे त्यांची त्यागपत्रे सुपुर्द केली. आयोगाचे पूर्णवेळ सदस्य महंमद सलीम रझा, अमीनुल इस्लाम, कोंगझरी चौधरी, विश्वजीत चंदा आणि तानिया हक अशी त्यागपत्र दिलेल्यांची नावे आहेत.
या आयोगाची नियुक्ती माजी राष्ट्रपती महंमद अब्दुल हमीद यांनी डिसेंबर २०२२ मध्ये केली होती. आयोगाच्या प्रवक्त्या युशा रेहमान यांनी याला दुजोरा दिला; परंतु त्यामागचे कारण स्पष्ट केले नाही.