बंदीची अधिसूचना गायब झाल्याने देहली उच्च न्यायालयाचा आदेश
नवी देहली – भारतात वर्ष १९८८ मध्ये विदेशी लेखक सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ (शैतानाची वाक्येे) या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. आता या बंदीची अधिसूचना सरकार न्यायालयात सादर करू शकत नसल्याने देहली उच्च न्यायालयाने पुस्तकावरील बंदी उठवली आहे. उच्च न्यायालयाने म्हटले की, ‘बंदी घालणारी अधिसूचना अधिकारी सादर करू शकत नसल्यामुळे ‘ती अस्तित्वात नाही’, असे गृहीत धरले पाहिजे.’ यामुळे आता हे पुस्तक भारतात आयात करून त्याची विक्री करता येऊ शकणार आहे.
काय आहे प्रकरण ?
वर्ष २०१९ मध्ये संदीपन खान नावाच्या व्यक्तीने हे पुस्तक आयात करण्यासंदर्भात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. संदिपन म्हणाले की, त्यांनी ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाची मागणी दिली होती; मात्र ३६ वर्षांपूर्वी सीमा शुल्क विभागाने प्रसारित केलेल्या अधिसूचनेमुळे हे पुस्तक आयात करता आले नाही. तथापि ही अधिसूचना कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध नव्हती किंवा त्यासंबंधीची कागदपत्रे कोणत्याही संबंधित अधिकार्याकडे उपलब्ध नव्हती.
काय आहे पुस्तकात ?
‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीचा हिंदीतील अर्थ ‘शैतानी आयतें’ असा आहे. या पुस्तकाच्या नावावरच मुसलमानांनी आक्षेप नोंदवला होता. या पुस्तकात रश्दी यांनी एक काल्पनिक कथा लिहिली आहे. कथा अशी आहे की, दोन चित्रपट कलाकार विमानाने मुंबईहून लंडनला जात आहेत. त्यातील एक म्हणजे अभिनेता जिब्रिल आणि दुसरा म्हणजे ‘व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट’ सलाउद्दीन. एका खलिस्तानी आतंकवाद्याने या विमानाचे अपहरण केले. यानंतर विमान अटलांटिक महासागरातून जात असतांना आतंकवाद्याने विमानात बाँबचा स्फोट केला. या घटनेत जिब्रिल आणि सलाउद्दीन दोघेही समुद्रात पडले, तरी बचावले. यानंतर दोघांचेही आयुष्य पालटते. एके दिवशी एका विशिष्ट धर्माच्या संस्थापकाच्या जीवनाशी संबंधित काही कथा जिब्रिलच्या स्वप्नात येतात. यानंतर तो त्या धर्माचा इतिहास नव्या पद्धतीने मांडण्याचा विचार करतो. त्या कथांमुळे इस्लामचा अवमान झाल्याने पुस्तकाला विरोध होऊ लागला. या कादंबरीवर बंदी घालणारा भारत हा पहिला देश होता. फेब्रुवारी १९८९ मध्ये मुंबईत मुसलमानांनी रश्दी यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४० हून अधिक जण घायाळ झाले होते.
इराणचे धर्मगुरु अयातुल्ला खोमेनी यांनी १९८९ मध्ये रश्दी यांच्याविरुद्ध फाशीचा फतवा काढला होता. २ वर्षांपूर्वीच रश्दी यांच्यावर अमेरिकेत आक्रमण झाले होते. त्यात त्यांना त्यांचा एक डोळा गमवावा लागला.