ऐन दिवाळीत भाग्यनगरमध्ये (तेलंगाणा) फटाक्याच्या दुकानाला आग लागून १० दुचाकी जाळून खाक झाल्या. फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी भांडणे होतात. प्रसंगी मारामार्या होऊन एकमेकांची डोकीही फोडली जातात. दिवाळीच्या दिवसांत अग्नीशमन दलावर आणि पोलीस प्रशासन यांच्यावर प्रचंड ताण असतो. मुंबईत तर फटाक्यांचा जीवघेणा धूर आणि आवाज नको म्हणून शहरातील अनेक जण दिवाळीच्या आधीच शहराबाहेर मित्रमंडळींकडे, अन्य नातेवाइकांकडे काही दिवसांसाठी रहायला जातात.
कुत्रे, मांजरी हेही फटाक्यांमुळे भयभीत होऊन सैरावैरा धावू लागतात. भीतीमुळे अनेकदा हे प्राणी आणि पक्षी जीवसुद्धा गमावतात. सोलापूर जिल्ह्यातील चिंचणी गावातील शेतकरी किरण जाधव यांच्या घरी १० वर्षांपूर्वी दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाला घाबरून भालू कुत्र्याने जीव सोडला. त्यानंतर ग्रामस्थांनी गावात फटाके बंदीचा निर्णय घेतला. गावकर्यांनी भालूच्या स्मृतीप्रीत्यर्थ ग्रामस्थांनी गावात १० सहस्र झाडे लावली. त्यामुळे एकेकाळी ओसाड असलेले हे गाव आज हिरवळीने बहरले आहे. जी गोष्ट चिंचणीसारख्या छोट्याशा गावातील लोकांच्या लक्षात आली, ती शहरातील सुशिक्षित लोकांच्या केव्हा लक्षात येणार ?
भारतात ३१ डिसेंबरच्या रात्री फोडल्या जाणार्या फटाक्यांवर खरे तर बंदी आणायला हवी. फटाक्यांमुळे कोणतेही लाभ होत नसून फटाक्यांमुळे होणारी हानी मात्र अपरिमित आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. तिमिराकडून तेजाकडे जाण्याची शिकवण देणारा सण आहे; मात्र दिवाळीतील जीवघेण्या फटाक्यांमुळे आपला प्रवास तेजाकडून तिमिराकडे चालला आहे कि काय ?, असे वाटू लागते. प्रकाशाचे महत्त्व सांगणार्या या सणानिमित्त फोडल्या जाणार्या फटाक्यांमुळे देशात प्रतिवर्षी सुमारे ५ सहस्र जणांना दृष्टी गमवावी लागते. दिवाळी आणि फटाके यांचा काहीच संबंध नाही. फटाक्यांची निर्मिती केवळ आतषबाजीसाठी करण्यासाठी करण्यात आली आहे. मग दिवाळीसारख्या पवित्र सणात ही प्रदूषणाची खैरात कशासाठी ? फटाक्यांमुळे क्षणिक सुख मिळते; मात्र त्यापासून होणारी हानी कैकपटींनी अधिक असते. केवळ दिवाळीच्या काळात अब्जावधी रुपयांच्या फटाक्यांचा निव्वळ धूर होतो. ज्या देशातील लाखो नागरिक आजही दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत, त्यांना दिवसातून २ वेळा अन्न मिळणेही दुरापास्त आहे. असे असतांना फटाके फोडण्यात आणि त्यापासून होणारी हानी निस्तरण्यात अब्जावधी रुपये खर्च होत असतील, तर ते देशाला नक्कीच परवडणारे नाही. फटाक्यांमुळे होणारी हानी लक्षात घेऊन दीपावलीच्या प्रकाशाला आलेली काजळी दूर करणे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.