अर्ज मागे घेण्याची मुदत संपली !
मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेण्याचा ४ नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता. ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. ही मुदत आता संपली आहे. त्यामुळे ज्या पक्षातील लोकांनी बंडखोरी करून अपक्ष रहाण्याचा निर्णय घेतला होता, तो त्यांना मागे घेण्याची मुदत संपली.
राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने सरवणकर निवडणूक लढवणार !
मुंबई – राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने सदा सरवणकर निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्री यांची त्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते गेले असता त्यांनी ‘निवडणूक लढवायची तर लढवा. मला भेटायची इच्छा नाही’, असे म्हटले. तोपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळही संपली. अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्याने मी निवडणूक लढवणार आहे, असे शिवसेनेचे शिंदे यांची घोषित केले.
महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी ८ सहस्र १२२ उमेदवार रिंगणात !
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी एकूण १० सहस्र ९०० उमेदवारी अर्ज करण्यात आले होते. त्यामधील १ सहस्र ६४५ अर्ज रहित झाले. ९ सहस्र २६० अर्ज वैध ठरल होते. यांतील एकूण १ सहस्र १३३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ४ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे एकूण ८ सहस्र १२२ उमेदवार रिंगणार आहेत.
शिवसेनेचे धोडी यांचा अर्ज मागे
पालघर – बोईसर विधानसभेचे शिवसेनेचे बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेले जगदीश धोडी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. जगदीश धोडी यांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जगदीश धोडी म्हणाले.
गोपाळ शेट्टी नरमले !
मुंबई – भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले गोपाळ शेट्टी यांचे बंड अखेर शमले असून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सरचिटणीस विनोद तावडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. लोकसभेच्या वेळी गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली होती.
सिद्धी कदम यांचा अपक्षाचा उमेदवार अर्ज मागे
पुणे – मोहोळ मतदारसंघातून रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी घोषित झाली होती; मात्र नंतर शरद पवारांनी एक दिवसातच निर्णय बदलत राजू खरे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर रमेश कदम आणि सिद्धी कदम या दोघांनीही अर्ज भरला होता; मात्र आज त्यांनी अर्ज मागे घेतला.