SC On Delhi Firecrackers Ban : दिवाळीत बंदी असतांनाही फटाके फोडल्यावरून सर्वोच्च न्यायालयाची अप्रसन्नता !

देहली सरकार आणि पोलीस यांच्याकडून मागितले उत्तर !

नवी देहली – देहली, तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथे फटाक्यांवर बंदी असतांनाही दिवाळीत फटाके फोडल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली आहे. प्रतिबंध असतांनाही फटाके कसे फोडले गेले ?, हे आम्ही राज्य सरकारला विचारू इच्छितो, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने देहलीच्या पोलीस आयुक्तांकडूनही उत्तर मागवले आहे. यासाठी दोघांना एका आठवड्याची समयमर्यादा देण्यात आली आहे. फटाक्यांच्या वापरावर संपूर्ण बंदी आण्यासाठी काय केले ?, याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचाही आदेश दिला आहे.

१. ‘रॉयटर्स’ या विदेशी वृत्तसंस्थेनुसार, १ नोव्हेंबरच्या सकाळी देहलीला जगातील सर्वांत प्रदूषित शहराचा दर्जा मिळाला.

२. एका अहवालाचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, यंदा येथील प्रदूषणाची पातळी आतापर्यंतची उच्चांकी ठरली, जी मागील २ वर्षांच्या तुलनेत अत्यधिक आहे.

३. न्यायालयाने नमूद केले की, दिवाळीच्या कालावधीत शेतातील तण (पेंढा) जाळण्याची प्रकरणेही वाढत होती. परिणामी न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा सरकार यांच्याकडूनही ऑक्टोबरच्या शेवटच्या १० दिवसांत पेंढा जाळल्याच्या घटनांचा तपशील मागवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ नोव्हेंबरला होईल.