‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात साधना आणि सेवा करण्यासाठी काही कुटुंबे त्यांच्या मुलांसह निवासाला आहेत. ही मुले ‘दैवी बालके’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ही मुले म्हणजे हिंदु राष्ट्र चालवणारी भावी पिढी आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८ वर्षे)
१ अ. ‘ऋग्वेदी सतत आनंदी आणि उत्साही असते.
१ आ. साधनेविषयी बोलणे : तिच्या बोलण्यात आध्यात्मिक शब्द असतात. तिचे बोलणे साधनेविषयी अधिक असते. तिचे साधनेविषयीचे विचार स्पष्ट आहेत.
१ इ. नियोजनबद्ध कृती करणे : तिचे प्रतिदिनचे नियोजन ठरलेले असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, उदा. झोपेतून उठणे, आवरणे, अल्पाहार करणे, शाळेत जाण्यासाठी सिद्ध होणे इत्यादी कृतींचे तिचे नियोजन असते. नियोजनात ‘खेळणे, अभ्यास करणे, ध्यानमंदिरात नामजप करणे, आरतीला नियमित जाणे’ इत्यादींचा समावेश असतो.
१ ई. स्वतःच्या ध्येयाविषयी प्रगल्भतेने बोलणे : एकदा मी ऋग्वेदीला विचारले, ‘‘तू मोठी झाल्यावर कोण होणार ?’’ तेव्हा तिने लगेच सांगितले ‘‘मी संत, तसेच जिल्हाधिकारी होणार ! जिल्हाधिकारी झाल्यावर मी प्रथम आपल्या गाढी नदीवरून जाणार्या गाड्यांसाठी पूल बांधणार. त्यामुळे आपल्या साधकांना त्रास होणार नाही.’’
२. चि. श्रीनिधी हरीष पिंपळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६ वर्षे)
अ. ‘श्रीनिधीला संतांनी नामजपादी उपाय करायला सांगितल्यावर ती न्यास करून तेवढा वेळ प्रामाणिकपणे उपाय करते.
आ. तिच्याकडून चूक झाल्यास तिच्या आईने तिला शिक्षा केल्यावर ती भोजनकक्षातील चुकांच्या फलकावर चूक लिहिते आणि त्या फलकासमोर स्वतःचे कान पकडून उभी रहाते.’
३. कु. सोनाक्षी सागर चोपदार (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय १३ वर्षे) आणि चि. अद्वैत सागर चोपदार (आध्यात्मिक पातळी ५८ टक्के, वय १० वर्षे)
अ. ‘हे दोघे बहीण-भाऊ आहेत. ते दोघे एकमेकांची काळजी घेतात.
आ. त्यांचे वडील श्री. सागर चोपदार सेवेसाठी सतत मुंबई, ठाणे इत्यादी ठिकाणी जात असतात; परंतु ‘वडिलांनी त्यांच्या समवेत रहावे’, असा त्यांचा आग्रह नसतो.’
४. देवद आश्रमातील बालसाधकांची जाणवलेली सामायिक गुणवैशिष्ट्ये
अ. ‘आश्रमातील बालसाधक नेहमी नीटनेटके रहातात. ते एकमेकांसह आनंदाने खेळतात. ते स्वतःची खेळणी आणि सायकल दुसर्या बालसाधकांना देतात.
आ. ते प्रत्येक गोष्ट आई-वडिलांना विचारून करतात.
इ. ते आश्रमातील प्रसाद आणि महाप्रसाद आनंदाने ग्रहण करतात.
ई. आश्रमातील एक साधिका बालसाधकांचा बालसंस्कारवर्ग घेते. सर्वच बालसाधक आनंदाने बालसंस्कारवर्गाला जातात. तेथे त्यांना स्तोत्रपठण, हिंदूंच्या सण-उत्सवांची माहिती, नामस्मरण, प्रार्थना इत्यादी शिकवले जाते.
उ. ते सर्व जण आश्रमातील संत आणि साधक यांचा आदर करतात.
ऊ. ते एकमेकांच्या वाढदिवसाला, तसेच अन्य साधकांच्या वाढदिवसाला शुभेच्छापत्रक बनवून देतात.
ए. स्वतःकडून चुका झाल्यावर ते क्षमा मागतात आणि फलकावर चुका लिहितात.
ऐ. सर्व बालसाधक स्वयंपाकघरात ‘भाज्यांचे वर्गीकरण करणे, घासलेली भांडी पुसणे’, इत्यादी सेवांमध्ये स्वतःहून साहाय्य करतात.
५. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘या बालसाधकांची सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवरील श्रद्धा, त्यांचा संतांविषयीचा आदर पाहून आम्ही त्यांच्यापुढे फारच न्यून पडतो’, असे मला वाटते. देवद आश्रमातील बालसाधकांची गुणवैशिष्ट्ये लिहून घेतल्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि ‘या बालसाधकांसारखा भाव, भक्ती अन् श्रद्धा माझ्यात निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना करते.’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.७.२०२४)