‘Sanatan Board’ : येत्या १६ नोव्हेंबरला देहलीमध्ये होणार धर्मसंसद !

‘सनातन बोर्ड’ स्थापन करण्याची होणार घोषणा ! 

नवी देहली – देशाची राजधानी देहलीमध्ये १६ नोव्हेंबर या दिवशी धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मसंसदेत धार्मिक नेते अनेक प्रमुख सूत्रे मांडणार आहेत. प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी ही माहिती दिली असून हिंदूंना धर्मसंसदेत उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी हिंदूंचे ‘सनातन बोर्ड’ स्थापन करण्याचेही आवाहन केले आहे.

देवकीनंदन ठाकूर म्हणाले की,

१. लव्ह जिहाद, गोहत्या, श्रीकृष्णाचे जन्मस्थान परत आणणे, यांसह अनेक महत्त्वाच्या सूत्रांवर या धर्मसंसदेत चर्चा होईल. आम्ही कुणाचेही वाईट करत नाही. आपल्या बहिणी-मुली सुरक्षित नाहीत, आपली संस्कृती, धर्म आणि देवताही सुरक्षित नाहीत. देवतांचा अपमान होतो. तिरुपतीच्या प्रसादात चरबी टाकून हिंदूंचा धर्म भ्रष्ट झाला आहे.

२. देशातील संसद आणि विमानतळ यांच्या भूमी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या असल्याचा दावा केला जात आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर १० ते १२ वर्षांनी वक्फ बोर्ड संपूर्ण देशावर स्वतःचा अधिकार गाजवेल. सनातन बोर्डाच्या सूत्रावर राजकीय पक्षांना प्रतिसाद आणि पाठिंबा द्यावा लागेल, असे ते म्हणाले.