मुसलमान समाज नितेश राणे यांना या निवडणुकीत चोख उत्तर देईल ! – नवाज खानी, अपक्ष उमेदवार

भाजपचे आमदार नितेश राणे मुसलमान समाजाच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करत असल्याचा आरोप

डावीकडून नवाज खानी आणि नितेश राणे

कणकवली – भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आजवर मुसलमान समाजाच्या विरोधात द्वेष निर्माण करणारी वक्तव्ये करून हिंदु-मुसलमान यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे; पण सामाजिक सलोखा राखण्यासाठी कुणी विरोध व्यक्त केला नाही. (देशभरात लव्ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, हलाल जिहाद, थूंक जिहाद, तसेच हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमण करणे, दंगली घडवणे आदींच्या माध्यमातून सामाजिक सलोखा कोण बिघडवत आहे ! याचे उत्तर नवाज खानी देतील का ? – संपादक) राणे यांनी त्यांच्या आमदारकीच्या गेल्या १० वर्षांत मुसलमान समाजासाठी काय केले ? त्यामुळे आमचा समाज नितेश राणे यांना या निवडणुकीत चोख उत्तर देईल, अशी चेतावणी कणकवली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी दिली आहे.

नवाज खानी कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी खानी पुढे म्हणाले, ‘‘कणकवली विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधात लढणारे नितेश राणे आणि संदेश पारकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार) म्हणजे एका नाण्याच्या २ बाजू आहेत. नितेश राणे आमच्या समाजाला अपकीर्त करण्याचे काम करत आहेत. भाजपचे प्रवक्ते झाल्यापासून ते मुसलमान समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्ये करत आहेत. तेव्हा संदेश पारकर गप्प का होते ? संदेश पारकर हे मुसलमान वस्तीमध्ये येऊन माझ्या विरोधात आरोप करत आहेत. ‘नितेश राणे यांनीच मतविभाजनासाठी मला निवडणुकीत उभे केले’, असल्याचे पारकर सांगत आहेत. वस्तूत: ‘मला निवडणुकीला उभे रहा’, असे सांगण्याची पात्रता नितेश राणे यांच्यात नाही. नितेश राणे आणि संदेश पारकर मतदारांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना माझा मतदार ओळखून आहे.’’