हिंदूंच्या देवतांची मंदिरे ही सामाजिक आणि आर्थिक केंद्रे !

व्याख्याते संदीप सिंह यांच्या ‘अ डिकेड फॉर मंदिर्स’ या पुस्तकाचे परीक्षण

‘अ डिकेड फॉर मंदिर्स’या पुस्तकाच्या दुसर्‍या भागात संदीप सिंह यांनी भारतात हिंदूंच्या मंदिरांविषयी केला जाणारा पक्षपात, मंदिरे पुनर्प्रस्थापित करणे आणि त्यावर हक्क सांगणे यांवर उपाययोजना सुचवल्या आहेत. यामध्ये देवतांना त्यांचा हक्क मिळण्याविषयी दावा करणे, पुजार्‍यांना मान देणे, तसेच मंदिरे ही सामाजिक आणि आर्थिक केंद्रे बनवण्याचा प्रयत्न करणे ही सूत्रे अंतर्भूत आहेत. हे पुस्तक संदीप सिंह यांच्या ‘टेंपल इकॉनॉमिक्स भाग – १’ या पुस्तकाचा पुढील भाग आहे. त्यांनी भारतातील मंदिरांची संख्या न्यून होत असल्याविषयी भाग – १ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. असे असले, तरी विशेषत: या धर्मनिरपेक्ष जगात मंदिरांवर दावा करण्यासंबंधी अडथळ्यांशी लढा देण्यासाठी केवळ बोलणे, ही उपाययोजना उपयोगाची नाही. त्यामुळे या पुस्तकात लेखकांनी कृतीच्या स्तरावर करण्यायोग्य उपाययोजना सुचवल्या आहेत.

पुस्तकाचे मुखपृष्ठ

१. हिंदु मंदिरांमध्ये होत असलेला निधर्मी हस्तक्षेप

लेखकाने या पुस्तकाचा प्रारंभ समाजातील ‘इकोसिस्टम’मध्ये (यंत्रणेमध्ये) दृढ झालेला ‘मंदिरांविरुद्ध पक्षपात’ या शीर्षकाने केला आहे, तसेच त्यांनी ‘आम्ही पूर्णपणे स्वतंत्र असूनही (खरोखरच आहोत का ?) भारताच्या कह्यातून मंदिरे कशी जात आहेत ?,’ या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. यासाठी लेखकाने कालीघाट मंदिराचे उदाहरण दिले आहे. या मंदिराने शाही वसाहतवादी शक्तींकडून काय काय सहन केले?, याविषयी माहिती दिली आहे. एक तर्कशील विचार करणारा हिंदु लेखकाशी सहमत होईल; कारण लेखकाने म्हटले आहे की, मंदिराच्या आतील व्यवहार न्यायालयासमोर आणणे, ही भारतातील मंदिरांच्या भविष्यकाळाच्या दृष्टीने मोठी चूक आहे. मंदिरांच्या अधिकार्‍यांच्या संदर्भात लोकांमध्ये असलेल्या पूर्वकल्पित धारणेविषयी सांगून लेखकाने म्हटले की, ‘मंदिरांचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यातील पदाधिकारी आणि ब्राह्मणांना मिळणारी संपत्ती न्यून करणे, हे १८ व्या शतकाच्या शेवटी चालू झाले. भारतामध्ये सर्वसाधारपणे असे गृहित धरले जाते की, जोपर्यंत मंदिर हे एखाद्या व्यक्तीच्या घरात असत नाही किंवा ते खासगी मालमत्ता म्हणून बांधलेले नाही, तोपर्यंत राज्यस्तरावरील अधिकार असलेल्या हिंदूंच्या संस्था किंवा वैयक्तिकरित्या हिंदु नागरिक यांना मंदिरात काय चालते, हे ठरवण्याचा अधिकार आहे.’

२. न्यायव्यवस्थेत मंदिराच्या संदर्भात होणारा पक्षपात

भारतीय न्यायव्यवस्थेची मानसिकता आणि मंदिराच्या संदर्भात होणारा पक्षपात यांविषयी विश्लेषण करतांना सिंह म्हणतात, ‘पुजारी न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीश आणि सरकारी हिंदू हे नवीन पुजारी झाले. त्यानंतर ते मंदिरातील कारभारावर अधिकार गाजवू लागले. हे केवळ वाद निर्माण झाल्याने न्यायालयात गेलेल्या मंदिरांच्या संदर्भात झाले नाही, तर सर्वच मंदिरांच्या संदर्भात झाले. न्यायालयातील प्रलंबित खटले सोडवण्यापेक्षा त्यांना मंदिरात येणार्‍या पैशाविषयी अधिक स्वारस्य होते.’

३. मंदिरांवर असलेल्या सरकारी नियंत्रणाविषयी हिंदु अद्यापही अनभिज्ञ

श्री. संदीप सिंह

हिंदूंच्या मंदिरावर असलेले सरकारी नियंत्रण हे अनेक हिंदूंसाठी भीतीदायक आणि वेदना देणारे सूत्र ठरले आहे. या वस्तूस्थितीची लेखक आपल्याला जाणीव करून देऊ इच्छितो. असे असले, तरी सर्वसाधारण हिंदूंमध्ये ठिणगी उडून त्याविषयीची जागृती निर्माण झाली नाही आणि त्यात अर्थपूर्ण सुधारणा घडवून आणावी, या दृष्टीने हे सूत्र समाजात पोचलेले नाही. ‘सर्वसाधारण माणसाला गोर्‍या लोकांकडून होणारी प्रशंसा भावते आणि स्वीकारली जाते’, ही आपली वसाहतवादी मानसिकता अजूनही आहे. याविषयीची माहिती लेखकाने या पुस्तकातील ‘थ्रू द लेन्स ऑफ फॉरेनर’ या प्रकरणातून अत्यंत हुशारीने मांडली आहे. हा विषय अधिक चांगला समजण्यासाठी लेखकाने डीओनी मूडी या हिंदु नसलेल्या व्यक्तीचा दृष्टीकोन दिला आहे.

इतिहासाचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना इतिहासाच्या अनेक पुस्तकांमधून हिंदूंंपेक्षा विदेशी लोक भारताविषयी जाणून घेऊन त्याची प्रशंसा करत असतात, हे दिसून येईल. या दृष्टीकोनातून समाजशास्त्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे.

४. हिंदूंचे अज्ञान

दुसर्‍या एका प्रकरणामध्ये लेखकाने वसाहतवादी लोकांकडून निर्माण करण्यात आलेले चुकीचे दृष्टीकोन आणि या संदर्भातील हिंदूंचे अज्ञान या गोष्टींवर आघात केला आहे; उदाहरणार्थ भारताच्या संदर्भात सांगायचे झाले, तर भारताचे नाव ‘इंडिया’ आहे, असा अपसमज करण्यात आला आहे, तसेच पंचतंत्रामधील ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे.) या श्लोकाचा हिंदूंच्या प्रत्येक बैठकीमध्ये चुकीचा दृष्टीकोन घेतला आहे’, असे लेखकाचे मत आहे. याविषयी अधिक खोलात जाऊन लेखकाने अशा हानीकारक दृष्टीकोनांचा हिंदु समाजावर होणारा परिणाम सांगितला आहे. हिंदु ग्रथांचा अभ्यास न करणे, ही हिंदु समाजाच्या संदर्भात अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीकोनांमध्ये विविधता आहे, यावर लेखकाने भर दिला आहे. हिंदु धर्मात असलेले स्वतःचे शत्रू शोधून काढण्याची आकलन क्षमता असली, तरी हे शत्रू आणि ते आखत असलेले डावपेच न ओळखणे यांमुळे शेवटी हिंदु समाजाची हानी होत आहे.

५. तिसर्‍या प्रकरणामध्ये सिंह यांनी विविध शत्रूंचा उल्लेख केला आहे. त्यात राजकीय हिंदू, सरकारी हिंदू, हेतू बाळगणारे आणि हेतू न बाळगणारे हिंदू यांचा समावेश आहे. या पुस्तकाच्या पहिल्या भागाप्रमाणे लेखकाने या संकल्पना अगदी अलीकडच्या उदाहरणासह मांडल्या आहेत.

६. कायद्याचे साहाय्य घेऊन मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी उपाययोजना

सध्याच्या वैचारिक युद्धामध्ये विविध विषयांच्या संदर्भात हिंदूंनी बचावात्मक न रहाता सक्रीय राहिले पाहिजे. हे कशा प्रकारे करता येईल, याविषयीचे मार्ग लेखकाने या पुस्तकातील ४ थ्या प्रकरणामध्ये सांगितले आहेत. सर्वांत प्रथम हिंदूंनी त्यांच्या मंदिरांवर दावा करून त्यातील मूर्तींची पुनर्स्थापना केली पाहिजे आणि त्यासाठी कायद्याचे साहाय्य घेतले पाहिजे. मंदिरांना त्यांचे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी लेखकाने अनेक उपाययोजना सांगितल्या आहेत. यामध्ये देवतांचे हक्क प्रस्थापित करणे, पुजार्‍यांना मान देणे, मंदिरांचे उत्सव किंवा जत्रा यांचे पुनरुज्जीवन करणे, मंदिरांची स्वच्छता राखणे, मंदिरांविषयीच्या साहित्यावर पुन्हा हक्क प्रस्थापित करणे, सामाजिक-आर्थिक कृतींचे केंद्र म्हणून मंदिराची पुर्नस्थापना करणे आणि नवीन मंदिरे बांधणे या उपाययोजना लेखकाने दिल्या आहेत.

हिंदूंना जागृत करण्यासाठी संदीप सिंह यांनी त्यांच्या पुस्तकात मंदिराच्या अर्थव्यवस्थेविषयी जी अंतर्दृष्टी दिली आहे, ती सर्व हिंदूंनी कृती करण्यासाठी दिशादर्शक आहे. सध्या लेखक या पुस्तकाच्या तिसर्‍या भागावर काम करत आहेत. हिंदु मंदिरांच्या संदर्भात असलेले महत्त्वाचे प्रश्न सांगणार्‍या आणि हिंदूंचे डोळे उघडणार्‍या सिंह यांच्या पुस्तकाच्या २ भागांचे सखोल चिंतन केल्यास तिसरा भाग वाचण्यासाठी ते नक्कीच प्रतिक्षा करत असतील.’

– जान्हवी नाईक, समाजशास्त्र पदवीप्राप्त

(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’)

संपादकीय भूमिका :

हिंदूंना स्वत:चे शत्रू कळले तरी त्यांचे डावपेच न कळल्याने हिंदु समाजाची हानी होत आहे !