दीपावली विशेष !
आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत लक्ष्मीपूजन केले जाते. धनामुळे निर्माण होणारा उन्माद व्यक्तीत निर्माण न होता त्याच्या वागण्यात विनयशीलता आणणारा, कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख करणारा, दारिद्र्यनिर्मूलन करणारा, अलक्ष्मीचा नाश करून लक्ष्मीची प्राप्ती करून देणारा, घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनात आनंद, उत्साह, प्रेम निर्माण करणारा सण म्हणजे लक्ष्मीपूजन ! आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. ‘जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष अन् गुणवती, तसेच पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते’, असे शास्त्र सांगते.
आजच्या घडीला मात्र लक्ष्मीप्राप्तीसाठी, म्हणजे धन मिळवण्यासाठी अनेक गैरमार्गांचा अवलंब केला जातांना दिसतो. ‘अल्प श्रमात श्रीमंत होण्याचा हा मार्ग आहे’, असे अनेकांना वाटते. ‘बोफोर्स’ तोफा, चारा, आदर्श, शिक्षण, चहा, चिक्की यांसारखे असंख्य घोटाळे देशात आणि राज्यात घडले. भारतात आतापर्यंत सर्व घोटाळ्यांमध्ये एक गोेष्ट समान दिसून येते, ती म्हणजे घोटाळा केल्यानंतर बहुतेक घोटाळेबाज देश सोडून पळून गेले. ‘किंगफिशर’ या आस्थापनाचे संस्थापक विजय मल्ल्या यांनी वर्ष २०१६ मध्ये ९ सहस्र कोटी कर्ज बुडवून देशातून पलायन केले. २० सहस्र कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क घोटाळा १९९० च्या दशकात उघडकीस आला होता. ७० सहस्र कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा, ११ सहस्र ३०० कोटी रुपयांचे पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज बुडवणारा नीरव मोदी, असे अनेक घोटाळे आहेत. कोलकाता येथील एक उद्योजक नीलेश पारेख याच्यावर २० अधिकोषांना २ सहस्र २२३ कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप आहे. यांतील अनेक जण विदेशात गेले. ‘भारतात सोन्याचा धूर निघत होता’, असे भारताच्या भूतकाळाविषयी अभिमानाने सांगतात; पण आज सर्वत्र घोटाळ्यांचा धूर निघत आहे.
काँग्रेसच्या काळात हा घोटाळ्यांचा डोंगर निर्माण होण्यास खतपाणी मिळाले. इंदिरा गांधी यांनी तर भ्रष्टाचाराला ‘शिष्टाचार’ केले आणि अक्षरशः आज प्रत्येक जण ते अनुभवत आहेत. या सर्व घोटाळ्यांचा पैसा एकत्र केला, तर पुन्हा एकदा देश महासत्ता होईल आणि देशात सोन्याचा धूर निघेल. स्वीस बँकेत भारतियांनी ठेवलेला पैसा आणला, तर भारतात कुणीही गरीब रहाणार नाही. ‘लवकरात लवकर भारत एक ‘सुजलाम् सुफलाम्’ असे हिंदु राष्ट्र बनावे’, हीच लक्ष्मीमातेच्या चरणी प्रार्थना !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव