मुंबई – प्रत्येक नग्न चित्र किंवा काही संभोग दर्शवणारी चित्रे (पेंटिंग) ही नेहमीच अश्लील म्हणून गणता येणार नाहीत, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने २५ ऑक्टोबर या दिवशी दिला. या वेळी न्यायालयाने आता हयात नसलेले फ्रान्सिस न्यूटन सोझा, तसेच अकबर पदमसी या चित्रकारांची चित्रे प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आणि सीमाशुल्क विभागाला त्यांच्या जप्त केलेल्या कलाकृती सोडून देण्याचे निर्देश दिले. या वेळी न्यायालयाने जुन्या निकालांचा संदर्भ दिले.
१. वरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती ‘पॉलीमेक्स इंडिया पीव्हीटी लिमिटेड’ या आस्थापनाचे मालक मुस्तफा कराचीवाला यांनी लंडनमध्ये लिलावामध्ये विकत घेतल्या होत्या. साहाय्यक आयुक्त आणि मुंबई सीमा शुल्क विभागाचे आयुक्त यांनी ओझा यांच्या ४ आणि पदमसी यांच्या ३ अशा एकूण ७ कलाकृती जप्त केल्या होत्या. ते त्या नष्ट करणार होते. त्यांना ५० सहस्र रुपये दंड ही ठोठावला होता.
२. ओझा यांची ‘लव्हर्स’ नावाने ओळखल्या जाणार्या या चित्रांची किंमत ४० कोटी रुपये आहे. वर्ष २०२३ मध्ये त्यांच्या कलाकृतींवर अश्लीलतेचा आरोप झाला होता.
तुम्ही खजुराहो मंदिरांविषयी काय म्हणाल ?
न्यायालयाने म्हटले की, अशा प्रत्येक कलाकृतींना मान्यता देता येऊ शकत नसलो, तरी सीमाशुल्क अधिकार्यांनी कुठल्याही तज्ञाचे मत घेण्याची तसदी घेतली नाही. त्यांनी वैयक्तिक निष्कर्ष काढून त्यावर बंदी घालणे अस्वीकारार्ह आहे. लैंगिक संबंध आणि अश्लीलता हे अर्थ नेहमीच समानार्थी घेऊ शकत नाही. मग तुम्ही खजुराहो मंदिरांविषयी काय म्हणाल ? अश्लीलतेच्या नावाखाली त्याचे राष्ट्रीय आणि सांस्कृतिक मूल्य तुम्ही न्यून करू शकत नाही.