पुस्तकात हिंदूंना ठरवण्यात आले होते गुन्हेगार
जयपूर (राजस्थान) – राजस्थानमध्ये मागील काँग्रेस सरकारने ‘अदृश्य लोग-उम्मीद और साहस की कहानियाँ’ या नावाचे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले होते. हे पुस्तकच शालेय अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय आताच्या भाजप सरकारने घेतला आहे. या पुस्तकात गोध्रा हत्याकांडाविषयी चुकीची माहिती देण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. वर्ष २००२ मध्ये गुजरातच्या गोध्रा रेल्वे स्थानकावर उभ्या असणार्या साबरमती एक्सप्रेसचे २ डबे मुसलमानांकडून जाळण्यात आले होते. यात ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता.
१. राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी सांगितले की, या पुस्तकात गोध्रा हत्याकांडाविषयी खोटी माहिती देण्यात आली आहे. तसेच २ समाजांमध्ये फूट कशी पडेल, याचा हेतूपुरस्सर प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकात साबरमती एक्सप्रेस ज्यांनी पेटवली, त्यांची बाजू योग्य होती, असाही उल्लेख आहे. हिंदूंची बाजू गुन्हेगारांप्रमाणे मांडण्यात आली आहे. गोध्रा प्रकरण घडले, तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नरेंद्र मोदी बसले होते. नरेंद्र मोदी यांचीही अपकीर्ती या पुस्तकात करण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
२. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी या पुस्तकाच्या प्रकरणी माजी शिक्षणमंत्री आणि काँग्रेसचे नेते गोविंद सिंह डोटासरा यांच्यावर आरोप केले आहेत. गोविंद सिंह यांनी जाणीवपूर्वक हे पुस्तक मुलांच्या अभ्यासक्रमात घेतले, असे दिलावर यांचे म्हणणे आहे.
३. गोविंद सिंह यांनी यावर म्हटले की, मी कुठल्याही पुस्तकाला संमती दिली नव्हती. मदन दिलावर माझ्या विरोधात खोटे आरोप करत आहेत.