Diwali In Pakistan : पाकिस्तानात पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी साजरी केली दिवाळी  

पाकिस्तानात दिवाळी साजरी करताना मरियम नवाझ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतासह जगभरात दिवाळी साजरी केली जात असतांना पाकिस्तानमध्येही दिवाळी साजरी करण्यात येत आहे. ३० ऑक्टोबर या दिवशी  पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ या हिंदु आणि शीख धर्मियांसह दिवाळी उत्सवात सहभागी झाल्या होत्या. या वेळी मुख्यमंत्री मरियम यांनी हिंदु महिलांशी संवादही साधला. याखेरीज १ सहस्र ४०० हिंदु कुटुंबांना प्रत्येकी १५ सहस्र रुपयांचे धनादेश देण्यात आले.

मुख्यमंत्री मरियम यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. लोकांना संबोधित करतांना मरियम म्हणाल्या की, जर कुणी अल्पसंख्यांकांवर अत्याचार करत असेल, तर मी पीडितांच्या पाठीशी उभी राहीन.

न्यूयॉर्कमध्येही दिवाळी साजरी

अमेरिकेतील सर्वांत उंच ‘वन वर्ल्ड ट्रेड सेंटर’मध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. या वेळी ‘लाइट शो’चे आयोजन करण्यात आले होते. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासानेही या सोहळ्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली आहेत.

भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी देहलीतील दूतावासात दिवाळी साजरी केली. या वेळी हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर त्यांनी नृत्य केल्याचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

संपादकीय भूमिका

मरियम नवाझ यांनी दिवाळी साजरी करण्यासह जे काही हिंदु पाकिस्तानात शिल्लक राहिले आहेत, त्यांचे संरक्षण करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे !