अमेरिकेकडून कॅनडाची पाठराखण !
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कॅनडात झालेल्या खलिस्तान्याच्या हत्येचे संचालन करत होते, असा आरोप कॅनडातील मंत्र्यांनी केला होता. त्यांचे उपपरराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन आणि राष्ट्रीय सुरक्षा अन् गुप्तवार्ता सल्लागार नेथाली ड्रौइन यांनी भारताच्या कॅनडातील कथित कारवायांची संवेदनशील माहिती ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला दिल्याची स्वीकृती दिली होती. आता अमेरिकेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करतांना म्हटले की, अमित शहा यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. कॅनडाशी या आरोपांवरून आम्ही चर्चा करू.
नेथाली ड्रौइन यांनी संसदेच्या सार्वजनिक सुरक्षा समितीला माहिती देतांना अमित शहा यांच्यासंदर्भात वरील विषय सांगितला होता, असे कॅनडातील एका वृत्तपत्राने सांगितले आहे. तसेच अशी संवेदनशील माहिती ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला द्यायला पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या अनुमतीची आवश्यकता नसल्याचेही ड्रौइन यांनी सांगितले.
भारत सरकारने कॅनडाचा आरोप फेटाळून लावला आहे. अमित शहा यांनी खलिस्तानी आतंकवाद्यांना लक्ष्य केल्याचा दावा अतिशय खोटा आणि बिनबुडाचा असल्याचे भारताने म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाउंदराला मांजराची साक्ष असल्याचाच हा प्रकार होय. अमेरिका आणि कॅनडा दोघेही खलिस्तान्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:चा भारतद्वेषी कंड शमवून घेत आहेत, हेच खरे ! |