सिंधुदुर्ग, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – रानबांबुळी (तालुका कुडाळ) येथील सनातनचे साधक श्री. सुरेश दाभोळकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली. २५ ऑक्टोबर २०२४ या दिवशी साधकांच्या साधनेच्या आढाव्यात त्यांनी ही घोषणा केली. यामुळे उपस्थित साधकांचा भाव जागृत झाला. या वेळी श्री. दाभोळकर आणि अन्य साधक यांनी मनोगत व्यक्त केले.
मनोगत व्यक्त करतांना श्री. सुरेश दाभोळकर म्हणाले की, १९९८ या वर्षी सनातन संस्थेत येण्यापूर्वी या भूतलावर एक व्यक्ती येणार आणि ती आपले राष्ट्र अन् धर्म यांचा उद्धार करणार, असे वाचनात आले होते. तेव्हापासून ‘ती व्यक्ती कोण असेल ?’ याविषयी मनात उत्सुकता होती. सनातन संस्थेत आल्यानंतर कळले की, ती व्यक्ती आपल्याला गुरु म्हणून लाभली आहे. तेव्हापासून माझी सनातन संस्थेविषयी श्रद्धा निर्माण झाली. त्यानंतर साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून माझी साधनेची वाटचाल चालू झाली. समाजात मी एका छोट्या कुटुंबात रहात होतो. साधनेत आल्यानंतर मात्र एक मोठे कुटुंब (सनातनचे साधक) भेटले. त्यामुळे सेवा करतांना कधी भीती वाटली नाही, धैर्य निर्माण झाले. आजचा हा क्षण गुरुदेव आणि साधक यांच्यामुळे लाभला.
उतारवयातही तरुणाला लाजवेल, अशी सेवा करणारे श्री. सुरेश दाभोळकरकाका !
१. ‘श्री. सुरेश दाभोळकरकाका कोणत्याही प्रसंगात नेहमी सकारात्मक असतात.
२. काका व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करतात आणि त्याचा आढावा उत्तरदायी साधकांना देतात.
३. तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणे
काका नेहमी साधना आणि सेवा यांना प्राधान्य देतात. त्यांचे वय ७१ वर्षे असूनही ते ‘सनातन पंचांगांचे वितरण करणे, आकाशकंदील, संस्कार वह्या, राख्या, दिवाळीनिमित्त भेटकार्ड यांची मागणी घेणे आणि त्यांचे वितरण करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, तसेच जिल्ह्यात एखादा कार्यक्रम असल्यास त्याची सिद्धता करणे’ इत्यादी सर्व सेवांमध्ये सहभागी होतात. सेवा तळमळीने आणि भावपूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. काकांची सेवा करण्याची तळमळ पहाता ‘ते तरुणांनाही लाजवतील, अशी सेवा करतात’, असे आपण म्हणू शकतो.
४. त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.’
– (सद्गुरु) सत्यवान कदम, कुडाळ सेवाकेंद्र, जिल्हा सिंधुदुर्ग. (३.३.२०२४)
श्री. सुरेश दाभोळकर यांची गुणवैशिष्ट्ये !
१. नम्रता
‘श्री. सुरेश दाभोळकरकाका प्रत्येकाशी अतिशय नम्रतेने बोलतात. ते ‘कुणाचेही मन दुखावणार नाही’, अशा प्रकारे सर्वांशी संवाद साधतात.
२. कौटुंबिक समस्या असतांनाही सर्वकाही गुरूंवर सोपवून सेवेला प्राधान्य देणे
काकांना पुष्कळ कौटुंबिक समस्या आहेत. १५ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी २ मुले आणि १ मुलगी यांचा सांभाळ केला. ४ वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचे लग्न झाले. त्यामुळे त्यांना घरातील सर्व कामे करावी लागतात. ते म्हणत असतात, ‘‘आता मला व्यवहारातून बाहेर पडायचे आहे.’’ ते सर्वकाही गुरूंवर सोपवतात. ते त्यांच्या समस्यांविषयी कधीही बोलत नाहीत. ते सेवेला प्राधान्य देतात.
३. शिकण्याची वृत्ती
आता काकांचे वय ७१ वर्षे आहे, तरीही ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात नवीन भ्रमणभाष विकत घेऊन साधकांच्या साहाय्याने भ्रमणभाषच्या वापराविषयी बर्याच गोष्टी शिकून घेतल्या. त्यांनी आतापर्यंत विविध कौशल्ये प्राप्त केली आहेत. ते चांगले सुतारकाम करतात. ‘आधुनिक पद्धतीने शेती करणे, नवीन विहीर बांधणे, विहिरीतील गाळ काढणे, फॅब्रिकेशनची (लोखंडी साहित्य बनवण्याची) कामे करणे’, अशा सर्व कला त्यांनी शिकून घेतल्या आहेत. त्यांना आयुर्वेदीय औषधांविषयीही बरीच माहिती आहे.
४. सेवेची तळमळ
अ. काकांना कुठलीही सेवा सांगितल्यावर ते लगेच सेवा स्वीकारतात. ते ‘गुरुपौर्णिमेच्या स्मरणिकेसाठी विज्ञापने गोळा करणे, सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदारांचे नूतनीकरण करणे’ इत्यादी सेवा करतात.
आ. सेवा करतांना समवेत साधक मिळाला नाही, तरी काका एकटेच सेवा करत असतात. त्यांनी गावात २०० ‘सनातन पंचांगां’चे वितरण केले. बर्याच वेळा त्यांनी घरोघरी एकट्यानेच जाऊन पंचांग वितरण केले आहे.
इ. २ वर्षांपूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होणार्या यज्ञासाठी समिधा हव्या होत्या. काका वयस्कर आहेत आणि त्यांची प्रकृती नाजूक आहे, तरीही त्यांनी एकट्याने मोठ्या प्रमाणात समिधा गोळा केल्या.
५. गावातील लोकांना आदर वाटणे
गावातील लोक काकांच्या शब्दाला आदरपूर्वक मान देतात. काकांनी सनातनच्या कार्यक्रमासाठी साहाय्य करण्याविषयी गावातील प्रमुखांना विचारले, तर ते लगेच साहाय्य करतात. एकदा सनातनच्या २ कार्यक्रमांसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा हवी होती. दोन्ही वेळा काकांनी प्रयत्न केले आणि यंत्रणा मिळवली.
६. अध्यात्मप्रसाराची तळमळ
जेव्हा गावातील लोक एकत्रित येतात, तेव्हा काका त्यांच्यासाठी सनातनच्या साधकांच्या मार्गदर्शनाचे नियोजन करतात. ते नेहमी म्हणतात, ‘‘आता जरी लोकांनी सनातनचे ऐकले नाही आणि कृती केली नाही, तरी भविष्यात त्यांना सनातनचे महत्त्व पटेल; म्हणून आपण सांगत राहिले पाहिजे.’’
‘दाभोळकरकाकांविषयी मला सद्गुरु सत्यवान कदम आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लिहिता आले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. गजानन शिवराम मुंज (वय ६९ वर्षे), कडावल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (६.१.२०२४)