वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्या वर्षी अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केल्याच्या प्रकरणी ९० सहस्र ४१५ भारतियांना अटक करण्यात आली. ‘यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन’ (सीबीपी) विभागाने ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत अवैधपणे देशात प्रवेश करणार्या लोकांची आकडेवारी घोषित केली आहे.
या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी २९ लाख लोकांना अवैधपणे अमेरिकेची सीमा ओलांडल्यासाठी अटक करण्यात आली होती. त्यांपैकी ९० सहस्र४१५ भारतीय होते. भारतीय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सीमा ओलांडणारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक भारतीय गुजरातचे रहिवासी होते. अमेरिकेची सीमा ओलांडण्यासाठी हे लोक कॅनडा सीमा किंवा मेक्सिको डंकी मार्ग यांचा वापर करतात. या वेळी कॅनडातून सीमा ओलांडणार्या भारतियांची संख्या सर्वाधिक होती. मेक्सिको डंकी मार्गाऐवजी कॅनडा सीमा ही त्यांची पहिली पसंती असते.
डंकी मार्गाद्वारे अमेरिकेत पोचण्यासाठी येतो ५० ते ७० लाख रुपये खर्च !
भारतातून मेक्सिको डंकी मार्गाद्वारे अमेरिकेत पोचण्यासाठीचा खर्च सरासरी २० ते ५० लाख रुपये आहे. काही वेळा हा खर्च ७० लाख रुपयांपर्यंत जातो. या कामात काही दलाल गुंतलेले आहेत.