मुख्याध्यापकासह अन्य शिक्षकांचे इतरत्र स्थानांतर !
सांगली, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी साहाय्यक शिक्षिका विजया शिंगाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी मुख्याध्यापक मारुती माळी यांच्यावर स्थानांतराची कारवाई करण्यात आली आहे. चौकशी अहवालात या दोघांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिले. (विद्यार्थ्यांना मारहाण करणारे असे शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ? अशा शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांवर कुसंस्कार होतात ! – संपादक)
या शाळेतील विद्यार्थ्यांना सामूहिक शिक्षा देण्यात आली होती. या प्रकरणी कैलास पाटील यांच्यासह नागरिकांनी आयुक्तांकडे तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर उपायुक्त विजया यादव, साहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. ही गोष्ट गंभीर असल्याने मुख्याध्यापकासह शाळेतील सर्व शिक्षकांचेही स्थानांतर करण्यात आले आहे. (केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? विद्यार्थ्यांमध्ये हिंसक वृत्ती वाढवणार्या अशा शिक्षकांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)