|
जळगाव – येथील प्रतापनगर भागातील एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात येत आहे. या प्रकरणी १८ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजता अधिवक्ता सुशील अत्रे यांच्या घरावर मोठ्या संख्येत जमलेल्या जमावाने दगडफेक, तसेच शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांना कह्यात घेतले आहे. दगडफेक करतांना घोषणा देण्यात येत असल्याने त्या ठिकाणी गोंधळही झाला.
मनसेचे जळगाव शहर उपाध्यक्ष आशीष सपकाळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह अत्रे यांच्या घरात घुसले. घरातील सदस्यांना धक्काबुक्की केली. दगडफेकीमुळे घरातील खिडक्यांच्या काचा फुटल्या. अत्रे यांची ४० ते ५० सहस्र रुपयांची हानी झाली. या वेळी जमावाकडून ‘आम्ही सर्वाेच्च न्यायालयाला जुमानत नाही. या पाडकामावर स्थगिती आणा अन्यथा आम्ही तुम्हाला मारून टाकू’, अशी धमकीही देण्यात आली होती. या प्रकरणी अत्रे यांनी आक्रमण करणार्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.
मी मंदिरविरोधी नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता ! – अधिवक्ता सुशील अत्रे
आम्ही मंदिरविरोधी असल्याचे काही लोक भासवत आहेत; मात्र मी आजवर जळगावातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांसाठी अधिवक्ता म्हणून बाजू मांडली आहे. आता पोलिसांनी १२ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अतिक्रमणाच्या विरोधात आम्ही वर्ष २००२ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट केली होती. वर्ष २०१५ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. आता न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई चालू आहे, अशी माहिती अधिवक्ता सुशील अत्रे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.