ठाणे येथे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अधिकारी निलंबित !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील १९ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. संबंधित तरुणी ७ मासांची गर्भवती होती. तिची प्रसूती कळवा पुलाखाली झाल्यानंतर ती ठाणेनगर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट करण्यास गेली होती. त्या वेळी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव यांनी गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पीडित तरुणीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर ती ७ मासांची गर्भवती होती. रात्री प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिला कळवा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिच्याकडे पूर्वीचे वैद्यकीय कागदपत्र आणि जन्मदाखल्याची मागणी करण्यात आली; परंतु कागदपत्र नसल्याने ती रुग्णालयातून बाहेर पडली. दुसर्‍या दिवशी ती कळवा पुलाजवळ आली असतांना तिची प्रसूती झाली. यात तिचे बाळ दगावले. त्यानंतर पीडित मुलगी तिच्या पालकांसोबत अत्याचार प्रकरणाची तक्रार प्रविष्ट करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली असता वरील प्रकार घडला.

संपादकीय भूमिका :

  • अशा कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
  • लैंगिक अत्याचारांच्या समस्येने परिसीमा ओलांडली असूनही हे गुन्हे नोंदवण्यास टाळणारे पोलीस रक्षक कि भक्षक ?