US On India Canada Row : (म्‍हणे) ‘कॅनडाचे आरोप गंभीर असल्‍याने भारताने ते गांभीर्याने घ्‍यावे आणि अन्‍वेषणात सहकार्य करावे !’

कॅनडा आणि भारत यांच्‍यातील वादात अमेरिकेचा चोंबडेपणा !

(डावीकडून) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्‍या सरकारचे प्रवक्‍ते मॅथ्‍यू मिलर व कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – कॅनडामध्‍ये ठार करण्‍यात आलेला खलिस्‍तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येचे अन्‍वेषण करण्‍यासाठी भारताने कॅनडाला सहकार्य करावे, असे अमेरिकेने पुन्‍हा एकदा सांगितले आहे.

अमेरिकेच्‍या सरकारचे प्रवक्‍ते मॅथ्‍यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत म्‍हटले की, भारताने कॅनडाला सहकार्य करावे, अशी आमची अपेक्षा होती; मात्र कॅनडातील स्‍वतःच्‍या दूतावासातील अधिकार्‍यांना माघारी बोलावून भारताने वेगळा मार्ग चोखाळला असल्‍याचे दिसत आहे. कॅनडाने केलेले आरोप गंभीर आहेत आणि त्‍याची गंभीरपणे नोंद घेतली पाहिजे. भारत आणि कॅनडा यांचे एकमेकांना सहकार्य करायला हवे होते; पण हा मार्ग अवलंबलेला दिसत नाही.

कॅनडाचे पंतप्रधान, तसेच पोलीस यांनी निज्‍जर यांच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणात भारताचे कॅनडातील उच्‍चायुक्‍तालयातील अधिकार्‍यावर आरोप केला होता. त्‍यामुळेच भारताने कॅनडाच्‍या भारतातील दूतावासातील ६ अधिकार्‍यांना देश सोडण्‍याचा आदेश दिला होता. त्‍यावरून अमेरिकेने वरील विधान केले.

संपादकीय भूमिका

भारताने काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्‍याचा अधिकार अमेरिकेला कुणी दिला ? ‘भारत म्‍हणजे मध्‍य-पूर्वेतील इस्‍लामी राष्‍ट्र आहे’, असे अमेरिकेला वाटते का ? अमेरिका जगभरात जे काही धंदे करत असते, त्‍यावर भारताने बोलायला चालू केले, तर अमेरिकेला ते चालेल का ?