सांगली, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्क विभाग, सांगलीच्या वतीने नुकताच ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉ. प्रियदर्शन चितळे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध समुपदेशक सौ. अर्चना मुळे उपस्थित होत्या. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून लेखिका सौ. विनिता तेलंग यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमा पूजन यांनी झाला. सर्व उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. प्रियदर्शन चितळे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात मातृशक्तीचे समाजातील महत्त्व, त्यांचे संस्कार आणि मूल्यांचे पुढील पिढ्यांमध्ये हस्तांतर या विषयांवर विचार मांडले. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक क्षेत्रातील सौ. नंदा झाडबुके, आर्थिक क्षेत्रातील सौ. अर्चना पवार, वैज्ञानिक क्षेत्रातील सौ. स्नेहल कोरडे, अन्य क्षेत्रात सौ. रोहिणी तुकदेव, धार्मिक क्षेत्रातील सौ. विद्या कुलकर्णी, कला क्षेत्रातील सौ. धनश्री आपटे, अधिवक्ता सौ. दीपा चौंडीकर, चिकित्सा क्षेत्रातील डॉ. (सौ.) जाई कुलकर्णी आणि क्रीडा क्षेत्रातील (सौ.) शिल्पा दाते-काळे यांचा सन्मानचिन्ह आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या श्रीमती अर्चना मुळे यांनी आपल्या समुपदेशन अनुभवांविषयी विचार मांडले आणि मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला, तसेच त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले.
प्रमुख वक्त्या श्रीमती विनिता तेलंग यांनी भारतीय संस्कृतीतील नवरात्री सणाचा उद्देश आणि देवीच्या ९ रूपांवर विवेचन केले, तसेच त्यांनी ‘भारतीय स्त्री शक्तीचे महत्त्व सध्याच्या युगात कसे आहे ?’ याविषयी आपले विचार मांडले, तसेच ‘लव्ह जिहाद’चा आतंकवाद, त्यावर उपाय अन् आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करतांनाची भूमिका कशी असावी ?, हे सांगितले. कार्यक्रमाची सांगता ‘कल्याण मंत्रा’ने झाली. या सोहळ्याला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सत्कारमूर्तींच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.