राष्ट्रहितैषी आणि भारतीय उद्योगसृष्टीतील ‘रत्न’ असलेले रतन टाटा !

१४४ वर्षांच्या ‘टाटा उद्योग’समूहाची धुरा समर्थपणे पेलणार्‍या रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर २०२४ या दिवशी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. सचोटी आणि विश्वास यांच्या भक्कम पायावर उभी असलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणते ‘टाटा’ ! नुसेरवानजी टाटा यांच्यानंतर जमशेटजी नुसेरवानजी टाटा, सर दोराबजी जमशेटजी टाटा आणि शेवटचे सर रतनजी जमशेटजी टाटा ही त्यांची परंपरा ! जमशेटजी टाटा हे टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक. सद्यःस्थितीत टाटाची उलाढाल १ लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यांचे पूर्वज पारशी धर्मगुरु होते; मात्र त्याहून वेगळी वाट धुंडाळत ते उद्योग क्षेत्रात उतरले. स्टील इंडस्ट्रिजचा पायाही जमशेटजी टाटा यांनीच घातलेला आहे. नुसेरवानजी, जमशेटजी टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाचा केवळ पाया रचला नाही, तर त्यांना भारतीय उद्योगसृष्टीचे ‘भीष्म पितामह’ही म्हटले जाते. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत रतन टाटा यांनी ‘टाटा उद्योग’क्षेत्र वाढवले.

१. रतन टाटा यांचा जीवनप्रवास

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ या दिवशी मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी न्यूयॉर्क (अमेरिका) शहरातील ‘रिव्हरडेट कंट्री’मध्ये घेतले. प्रारंभीच्या काळात ते ‘टाटा एअरलाईन्स’ आणि ‘टाटा इंडस्ट्रिज’मध्ये विविध दायित्व पार पाडत होते. वर्ष १९९१ ते २०१२ या काळात त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाचे उत्तरदायित्व लीलया पेलले. ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ते ‘टाटा समूहा’चे अंतरिम ‘अध्यक्ष’ होते. वर्ष २००० मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ आणि वर्ष २००८ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ देऊन गौरव करण्यात आला होता. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १ लाख रुपयांची ‘नॅनो कार’ सिद्ध करण्याची संकल्पना सिद्ध करून ती प्रत्यक्षात आणली. रतन टाटा यांनी ब्रिटीश उद्योगसमूह ‘टेटली’, ‘फोर्ड’ कंपनी, युरोपमधील ‘कोरस’ ही पोलाद उत्पादन कंपनी या काही महत्त्वाच्या कंपन्या विकत घेतल्या आहेत.

२. साधेपणाने आणि दयाळू वागण्याने लोकांची मने जिंकली !

रतन टाटा हे स्वतःच एक महान व्यक्तीमत्त्व होते, ज्यांनी नेहमी आपल्या साधेपणाने आणि दयाळू वागण्याने लोकांची मने जिंकली. त्यांचा साधेपणा हा अनेकदा कोणत्या ना कोणत्या मार्गाने लोकांना शिकवतांना दिसला.

३. सर्वसामान्य कर्मचार्‍याप्रमाणे गणवेश घालून कामाला प्रारंभ करणारे रतन टाटा !

सर्वसामान्य कर्मचार्‍याप्रमाणे गणवेश घालून रतन टाटा यांनी करियरचा प्रारंभ वर्ष १९६२ मध्ये ‘टाटा स्टील’च्या जमशेदपूर येथील कारखान्यात कामाद्वारे केला. रतन टाटा हे जमशेदपूरमध्ये ६ वर्षे होते. तिथे त्यांनी कारखान्यात एका सर्वसामान्य कर्मचार्‍याप्रमाणे निळ्या रंगाचा गणवेश घालून ‘अप्रेनटिसशिप’ (प्रशिक्षण काळ) पूर्ण केली होती. यानंतर त्यांना ‘प्रकल्प व्यवस्थापक’ बनवण्यात आले. नंतर ते व्यवस्थापकीय संचालक असलेल्या एस्.के. नानावटी यांचे विशेष साहाय्यक झाले. रतन टाटा यांच्या मेहनती स्वभावाची ख्याती मुंबईपर्यंत पोचली आणि जे.आर्.डी. टाटा यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतले. यानंतर त्यांनी १ वर्ष ऑस्ट्रेलियात काम केले. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या ‘सेंट्रल इंडिया मिल’ आणि ‘नेल्को’ या कंपन्यांना रूळावर आणण्याचे दायित्व जे.आर्.डी. टाटा यांनी रतन टाटा यांना दिले. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली ‘नेल्को’चा कायापालट ३ वर्षांमध्ये झाला. कधीकाळी आर्थिक अडचणीत असलेल्या ‘नेल्को’ने लाभ कमावण्यास प्रारंभ केला. वर्ष १९८१ मध्ये जे.आर्.डी. टाटा यांनी रतन टाटा यांना ‘टाटा इंडस्ट्रिज’चे प्रमुख केले.

४. रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार !

अ. तुमची चूक तुमची एकट्याची आहे, तुमचे अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कुणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि आयुष्यात पुढे जा.

आ. तुमचे जीवन चढ-उतारांनी भरलेले आहे, त्याची सवय करा.

इ. टीव्हीचे आयुष्य खरे नाही आणि टीव्ही मालिकेसारखे आयुष्यही नाही. वास्तविक जीवनात विश्रांती नाही, फक्त काम आहे.

ई. जे लोक इतरांची नक्कल करतात, ते थोड्या काळासाठी यश मिळवू शकतात; परंतु ते आयुष्यात फार प्रगती करू शकत नाहीत.

उ. योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य सिद्ध करतो.

ऊ. ‘आपण माणसे आहोत, संगणक नाही’, त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या, नेहमी गंभीर राहू नका.

ए. चांगला अभ्यास आणि मेहनत करणार्‍या तुमच्या मित्रांना कधीही चिडवू नका. एक वेळ अशी येईल की, तुम्हालाही त्यांच्या हाताखाली काम करावे लागेल.

ऐ. तुम्हाला जे योग्य वाटते, त्यासाठी नेहमी उभे रहा आणि शक्य तितके निष्पक्ष रहा.

(साभार : विविध संकेतस्थळे)